थॅलेसेमियाचे रुग्ण धोक्यात

By admin | Published: May 9, 2017 02:01 AM2017-05-09T02:01:56+5:302017-05-09T02:01:56+5:30

थॅलेसेमियाच्या रुग्णांना औषधांचा तुटवडा पडू देऊ नका, असे निर्देश खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे असताना मेयो, मेडिकलमध्ये या रोगावरील औषधांचा तुटवडा पडला आहे.

Thalassemia patients are in danger | थॅलेसेमियाचे रुग्ण धोक्यात

थॅलेसेमियाचे रुग्ण धोक्यात

Next

मेयो, मेडिकलमध्ये औषधांचा तुटवडा : केवळ सातच दिवसांचे दिले जात आहे औषध
आज जागतिक थॅलेसेमिया दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थॅलेसेमियाच्या रुग्णांना औषधांचा तुटवडा पडू देऊ नका, असे निर्देश खुद्द पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे असताना मेयो, मेडिकलमध्ये या रोगावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. महिनाभराचे औषध देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांची औषधे दिली जात आहे. गडचिरोली, गोंदियासह इतरही ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसत आहे, तर काही रुग्ण औषधांशिवाय राहण्याची शक्यता असून अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
आनुवंशिक अथवा काही ठराविक कारणांमुळे लहानपणापासून थॅलेसेमिया रोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ठराविक कालावधीत ‘ब्लडट्रान्समिशन’, चाचण्या अशी उपचार पद्धती असणाऱ्या या रोगाला नियमितपणे औषधे देणेही गरजेचे आहे.
औषधांविना रुग्णाच्या यकृताला सूज येण्याची भीती असते. त्यामुळे थॅलेसेमिया बाधित रुग्णाला डेफ्रिजिट, डेसिरॉक्स किंवा असुनरा या गोळ्या घेणे अनिवार्य असते. मात्र ही औषधे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपलब्धच नाहीत. केवळ मेयो, मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. परंतु येथेही औषधांच्या तुटवड्याचे कारण पुढे करून कमी औषधे दिली जात असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक अडचणीत आले आहेत.
गडचिरोली- नागपूर माराव्या
लागतात चकरा
गडचिरोली येथून औषधांसाठी मेडिकलमध्ये आलेले दिलीप कौशिक म्हणाले, माझ्या १० वर्षाच्या मुलीला थॅलेसेमिया आहे. गडचिरोलीतील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात थॅलेसेमियाचे औषध मिळत नाही. बाहेर ही औषधे फार महागडी असल्याने विकत घेणे परवडत नाही. यामुळे मेडिकलमध्ये यावे लागते. यातही मुलीचे लोहाचे प्रमाण नेहमी वाढलेले असते. परिणामी, डॉक्टरांनी ४०० ग्रॅमचे ‘असुनरा’ हे औषध दोन वेळा घेण्यास सांगितले आहे.
परंतु मेडिकलमध्ये ४०० ग्रॅमच्या पंधराच गोळ्या मिळतात. हे औषध सातच दिवस पुरते. यामुळे आठवड्यातून एकदा गडचिरोलीहून मेडिकलमध्ये यावे लागते. शिवाय, गडचिरोलीत रक्त चढविताना आवश्यक असलेले ‘ब्लड टेस्ट फिल्टर’ उपलब्ध होत नाही. गडचिरोली-नागपूर प्रवासात मोठा पैसा खर्च होतो. शिवाय रुग्णांचे हालही होतात. गडचिरोलीतच ही सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

पालकमंत्र्यांच्या निर्देशाला ‘खो’
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या वर्षी थॅलेसेमियाच्या समस्यांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयो रुग्णालयाचे तत्कालीन प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुनील लांजेवार, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे व थॅलेसेमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी उपस्थित होते. यात पालकमंत्र्यांनी बाहेरगावच्या रुग्णांना एक महिन्याचे औषध द्या असे स्पष्ट निर्देश दिले. परंतु आरोग्य विभागाच्या रुग्णालयात ही औषधे अद्यापही उपलब्धच झाली नाहीच, मेयो, मेडिकलमध्ये रुग्णांना केवळ पंधराच दिवसांचे तर काहींना केवळ सातच दिवसांचे औषध मिळत असल्याचे वास्तव आहे.

Web Title: Thalassemia patients are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.