थॅलेसेमियाचे रुग्ण धोक्यात : मेयोमध्ये औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:08 AM2020-02-23T01:08:27+5:302020-02-23T01:09:09+5:30
मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयोमध्ये थॅलेसेमियावरील औषधांचा तुटवडा पडला आहे. जिथे पंधरा दिवसांचे किंवा महिनाभराचे औषधे देणे आवश्यक असताना केवळ सात दिवसांचे औषधे दिले जात आहे. इतर जिल्ह्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांना याचा फटका बसत आहे. वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने काही रुग्ण औषधांंशिवाय राहण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
आनुवंशिक अथवा काही ठराविक कारणांमुळे लहानपणापासून थॅलेसेमिया रोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ठराविक कालावधीत ‘ब्लडट्रान्समिशन’, चाचण्या अशी उपचार पद्धती असणाऱ्या या रोगाला नियमितपणे औषधे देणेही गरजेचे आहे. औषधांविना रुग्णाच्या यकृताला सूज येण्याची भीती असते. त्यामुळे थॅलेसेमिया बाधित रुग्णाला डेफ्रिजिट किंवा डेसिरॉक्स किंवा असुनरा या गोळ्या घेणे अनिवार्य असते. मात्र या औषधी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपलब्धच नाहीत. केवळ मेयो, मेडिकल व डागा रुग्णालयात उपलब्ध आहेत. यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. परंतु मेयो येथे औषधांचा तुटवड्याचे कारण पुढे करून कमी औषध दिले जात असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक अडचणीत आले आहेत.
औषधांसाठी चकरा मारण्याची आली वेळ
गडचिरोली येथून औषधांसाठी मेयोमध्ये आलेले एका रुग्णाचे वडील म्हणाले, माझ्या १० वर्षाच्या मुलीला थॅलेसेमिया आहे. गडचिरोलीतील आरोग्य विभागाच्या रुग्णालयात थॅलेसेमियाचे औषध मिळत नाही. बाहेर ही औषध फार महागडी असल्याने विकत घेणे परडवत नाही. यामुळे नागपूरच्या मेडिकलमध्ये यावे लागते. यातही मुलीचे लोहाचे प्रमाण नेहमी वाढलेले असते. परिणामी, डॉक्टरांनी ४०० ग्रॅमचे ‘असुनरा’ हे औषध दोन वेळा घेण्यास सांगितले आहे. परंतु ४०० ग्रॅमच्या पंधराच गोळ्या मिळतात. हे औषध सातच दिवस पुरते. यामुळे आठवड्यातून एकदा यावे लागते. गडचिरोली-नागपूर प्रवासात मोठा पैसा खर्च होतो. शिवाय रुग्णाचे हालही होतात. गडचिरोलीतच ही सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
महिन्याची औषधी मिळणे आवश्यक
थॅलेसेमियाचे रुग्ण आधीच व्याधीने त्रस्त असतात. त्यात वारंवार रुग्णालयाच्या चकरा मारायला लावणे योग्य नाही. यामुळे १५ दिवसांचे किंवा सात दिवसांचे औषधे देण्यापेक्षा महिन्याभराचे एकत्र औषधे देणे आवश्यक आहे. यासाठी थॅलेसेमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाकडून आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठवून त्यांचे याकडे लक्ष वेधण्यात येईल.
डॉ. विंकी रुघवानी
अध्यक्ष, थॅलेसेमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडिया