नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळातील डॉक्टरांचे थाळी बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:20 AM2018-12-28T01:20:37+5:302018-12-28T01:21:44+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कणा असलेल्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. या विरोधात सोमवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलन करून मेडिकलचा परिसर दणाणून सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कणा असलेल्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. या विरोधात सोमवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलन करून मेडिकलचा परिसर दणाणून सोडला.
रुग्णालयात २४ तास सेवा देऊनही वेळेवर विद्यावेतन मिळत नसल्याने राज्यात बहुसंख्य मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. नागपूर मेडिकलच्या निवासी डॉक्टरांना नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्याचे अद्यापही विद्यावेतन मिळाले नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी निवासी डॉक्टरांनी काळी रिबीन बांधून रुग्ण सेवा दिली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलनातून लक्ष वेधले. विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वी असाच प्रश्न समोर आला होता. तेव्हा मेडिकल प्रशासनाने स्थानिकस्तरावर स्वत:च्या खात्यातून निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन अदा केले. मात्र यावर कोषागार विभागाने आक्षेप नोंदविला. यातच दोन महिन्याचे विद्यावेतन देण्या एवढा निधी सध्या खात्यात नसल्याचे सांगण्यात येते. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनापोटी अद्याप १८ कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे शिल्लक आहे. ती रक्कम वळती झाल्यानंतरच हा तिढा सुटणार असल्याचे बोलले जात आहे.
विद्यावेतनावर महिन्याकाठी दोन कोटी ४० लाखांचा खर्च
मेडिकलमध्ये सुमारे ६०० निवासी डॉक्टर आहेत. तर वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संख्या १५० इतकी आहे. त्यांच्या विद्यावेतनावर महिन्याकाठी दोन कोटी ४० लाख रुपये इतका खर्च होतो. नोव्हेंबरपासून डॉक्टरांना विद्यावेतनच मिळाले नाही. बुधवारी मोर्चा काढून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. अधिष्ठाता कार्यालयासमोर शेकडो डॉक्टरांनी एकत्र येत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. शासनाकडून डॉक्टरांचा छळ सुरू असून, विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
तीन दिवसांची मुदत
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मार्डचे पदाधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पुढील तीन दिवसांत विद्यावेतनाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मिळाले आहे. यामुळे आता तीन दिवसानंतर आंदोलनाची भूमिका स्पष्ट होईल.
डॉ. आशुतोष जाधव
अध्यक्ष, मार्ड मेडिकल