कोरोना काळात मलेरियाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:34+5:302021-07-26T04:07:34+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला असताना पूर्व विदर्भात मलेरियाच्या थैमानामुळे आरोग्याची स्थिती अधिक गंभीर ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला असताना पूर्व विदर्भात मलेरियाच्या थैमानामुळे आरोग्याची स्थिती अधिक गंभीर झाली. २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये तब्बल १४६ टक्क्याने रुग्ण वाढले. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात १६२ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १५४ टक्के, भंडारा जिल्ह्यात ४० टक्के तर गोंदिया जिल्ह्यात २८ टक्क्याने वाढ झाली. केवळ नागपूर व वर्धा जिल्ह्यात रुग्णांत घट झाली. या वर्षी जूनपर्यंत १७६६ नव्या रुग्णांची नोंद झाली.
मलेरियाची लागण होणाºया जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचाही नंबर लागतो. ‘अॅनोफेलिस’ नावाचा डास चावल्यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. वाढती लोकसंख्या आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे मलेरिया पसरतो. जगात दरवर्षी ३० ते ५० कोटी नागरिकांना मलेरिया होतो. त्यापैकी हजारो नागरिक मृत्यूच्या खाईत ढकलले जातात. जगात प्रती ३० सेकंदांना एक बालक मलेरियाला बळी पडतो. पूर्व विदर्भातही मलेरियाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. २०१७ मध्ये ८४५९, २०१८ मध्ये ५८४६, २०१९मध्ये २८६५ तर २०२०मध्ये जवळपास अडीचपटीने म्हणजे, ७०५१ रुग्णांची नोंद झाली.
-गडचिरोली जिल्ह्यात ६४८५ रुग्ण
पूर्व विदर्भातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक मलेरियाचा रुग्णांची नोंद गडचिरोली जिल्ह्यात होते. २०१९ मध्ये या जिल्ह्यात २४७४ रुग्ण आढळून आले असताना २०२०मध्ये ६,४८५ रुग्णांची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यात २०१९ मध्ये २७० तर २०२० मध्ये ३४७, चंद्रपूर जिल्ह्यात २०१९मध्ये ७७ तर २०२०मध्ये १९६, भंडारा जिल्ह्यात २०१९मध्ये १० तर २०२० मध्ये १४ रुग्ण आढळून आले. या उलट नागपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये २८ तर २०२०मध्ये ९ तर वर्धा जिल्ह्यात २०१९मध्ये ६ तर २०२० मध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
- मागील सहा महिन्यात १७६६ रुग्ण
कोरोनाचा पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच जानेवारीपासून दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. सध्या ही लाट ओसरली असली तरी मलेरियाच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यात १७६६ रुग्ण आढळून आले. यात एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील १७०३, चंद्रपूर जिल्ह्यात ३४, गोंदिया जिल्ह्यात २५, नागपूर जिल्ह्यात ३, वर्धा जिल्ह्यात १ तर भंडारा जिल्ह्यात शुन्य मृत्यूची नोंद आहे.
-मागील तीन वर्षातील मलेरिया
जिल्हा :२०१८: २०१९ :२०२०
भंडारा :१७: १० :१४
गोंदिया :७०५: २७०: ३४७
चंद्रपूर :२५०: ७७: १९६
गडचिरोली:४७६१: २४७४: ६,४८५
नागपूर: ८८: २८: ०९
वर्धा :२५: ०६: ००
::जानेवारी ते जून या कालावधीतील मलेरिया
जिल्हा : रुग्ण
नागपूर : ०३
वर्धा : ०१
भंडारा : ००
गोंदिया : २५
चंद्रपूर : ३४
गडचिरोली : १७०३