ठाणे पोलिसांकडून ‘ब्लॅकमेलर’चा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:30+5:302021-03-15T04:09:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आत्महत्येच्या एका प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळणाऱ्या आणि प्रचंड मानसिक त्रास देऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आत्महत्येच्या एका प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन लाखोंची खंडणी उकळणाऱ्या आणि प्रचंड मानसिक त्रास देऊन एका अधिकाऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या ब्लॅकमेलर प्रेयसी आणि खंडणीबाज पोलीस अधिकाऱ्याचा ठाणे जिल्हा पोलिसांनी नागपुरात शोध चालवला आहे. दुसरीकडे आरोपी नीता मानकर- खेडकर, तिचा भाऊ दादा मानकर आणि पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे भूमिगत झाले आहेत.
सचिन चोखोबा साबळे (वय ३८) नामक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यासोबत नीता मानकर उर्फ खेडकर हिचे अनैतिक संबंध होते. एसटीत ड्रायव्हर असलेल्या नीताच्या नवऱ्याला व्यभिचारी पत्नीच्या संबंधाची माहिती झाल्याने त्याने डिसेंबर २०२० मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणात नीताशी संगनमत करून सचिन साबळेंना ब्लॅकमेल करून प्रारंभी मासुरकर नामक व्यक्तीच्या माध्यमातून साडेचार लाख रुपये उकळले. ही सर्व रोकड ठाणेदार दुर्गेने हडपल्याचे सांगून तपास अधिकारी दीपक चव्हाणने दोन लाख रुपये मागितले. नंतर याच भामट्याने पुन्हा मेश्रामच्या नावाने तीन लाखांची मागणी केली. तिकडे नीताने साबळेंमागे लग्नासाठी तगादा लावला. तिची मुलगी आणि भाऊ दादा मानकर यानेही साबळेंवर लग्नासाठी दडपण वाढवले. त्यांच्या त्रासाला कंटाळून १८ फेब्रुवारीला साबळेंनी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, त्याच्या डायरीतून हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आल्यानंतर सचिनचे मोठे बंधू चंद्रकांत चोखोबा साबळे यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी साबळेंच्या आत्महत्येला कारणीभूत असलेली नीता, तिची मुलगी, भाऊ दादा मानकर, पीएसआय दीपक चव्हाण, तत्कालीन ठाणेदार दुर्गे आणि मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली तर अन्य आरोपींना शोधण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात ठाण मांडून आहे. आरोपी मात्र फरार झाले असून सोमवारी ते अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.
----
रिमूव्ह टू सर्व्हिस
या प्रकरणात चव्हाणला निलंबित करण्यात आले असून दुर्गेचेही निलंबन अपेक्षित आहे. चव्हाणला अटक करण्यात आल्याने त्याला रिमूव्ह टू सर्व्हिस केले जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.
----