जागतिक मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाणेदार यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 09:54 PM2018-12-05T21:54:30+5:302018-12-05T21:56:19+5:30
जागतिक मराठी अकादमीच्यावतीने १६ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ४, ५ व ६ जानेवारी रोजी नागपूर येथे होऊ घातले आहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे रहिवासी असलेले उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक मराठी अकादमीच्यावतीने १६ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ४, ५ व ६ जानेवारी रोजी नागपूर येथे होऊ घातले आहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे रहिवासी असलेले उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली आहे.
अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख पाटील व गिरीश गांधी, कोषाध्यक्ष उदय लाड व आयोजन समितीचे शहर समन्वयक शशीकांत चौधरी यांनी डॉ. ठाणेदार यांच्या निवडीबाबत माहिती दिली. युएसएच्या अॅक्रॉन विद्यापीठातून पॉलिमर केमिस्ट्री विषयात पीएचडी प्राप्त डॉ. ठाणेदार यांनी रसायन व औषधी निर्मितीचा उद्योग स्थापन केला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अमेरिकेतील तरुण उद्योजक म्हणून तीनदा सन्मानितही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या मिशिगन राज्याच्या राज्यपाल पदाची निवडणूकही त्यांनी लढविली असून तब्बल दोन लाख मते प्राप्त केली होती. अमेरिकेत राहणाºया एखाद्या भारतीयाचे हे यश अभिमानास्पद आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘ही श्रींची इच्छा’ या आत्मकथेनेही विक्रीचे उच्चांक गाठले आहेत. उत्साही आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. ठाणेदार यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जागतिक मराठी साहित्य परिषद - ‘शोध मराठी मनाचा’ हे तीन दिवसीय संमेलन वैदर्भीयांसाठी साहित्यिक मेजवानी ठरणार आहे. विशेष म्हणजे अकादमीचे पहिले जागतिक संमेलन नागपुरातच झाले होते व राम शेवाळकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर शहर वेगाने विकसित होत असून सांस्कृतिक क्षेत्रातही शहर झपाट्याने पुढे येत आहे. अकादमीतर्फे आतापर्यंत झालेली सर्व जागतिक मराठी संमेलने भारतातच भरवली गेली आहेत. मात्र त्यात सहभागी होणारे साहित्यिक, कलावंत, व्यावसायिक, उद्योजक प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे परदेशातूनही येतात. त्यामुळेच याला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.