टीसीच्या सतर्कतेमुळे ‘तो’ सुखरूप आईच्या कुशीत पोहोचला
By नरेश डोंगरे | Published: November 21, 2024 09:41 PM2024-11-21T21:41:47+5:302024-11-21T21:43:02+5:30
युवकाकडून बालकाला फूस : बिलासपूरहून इंदूरला पळवून नेण्याचा प्रयत्न
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एका युवकाने बालकाला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्तव्यावर असलेल्या टीसीच्या (तिकीट तपासणीस) सतर्कतेमुळे हा बालक सुखरूप त्याच्या आईच्या कुशीत पोहोचला.
पराग (नाव काल्पनिक, वय ११ वर्षे) हा बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला वडील नाही. त्याच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. आई खेळणी विकून कसेबसे कुटुंबीयांचे उदरभरण करते. समवयस्क मुला-मुलींना ज्या सुखसुविधा मिळतात, त्या आपल्याला मिळत नसल्याने पराग हिरमुसला होता. त्याची ती स्थिती हेरून एका युवकाने त्याला फूस लावून इंदूरला पळवून नेण्याचा कट रचला. त्यानुसार, परागला घेऊन तो युवक दोन दिवसांपूर्वी बिलासपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने इंदूरकडे निघाला. गाडीत मुख्य तिकीट निरीक्षक (सीटीआय) इंतेखाब आलम यांची नजर पडताच तो युवक गायब झाला.
एकटा पराग कावराबावरा दिसल्याने आलम यांनी त्याला जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली. त्याला चहा-नाश्ता करविला. प्राथमिक विचारपूस केली असता मुलाने घरची स्थिती ऐकवून आईला न सांगताच युवकासोबत पळून आल्याची माहिती दिली. हा चाइल्ड ट्रॅफिकिंगचा प्रकार असल्याचे लक्षात येताच आलम यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना कळवून मुलगा सुखरूप त्याच्या आईकडे पोहोचेल अशी व्यवस्थाही केली.
अधिकाऱ्यांकडून सन्मान
कर्तव्यासोबतच सामाजिक दायित्वाची जाण बाळगणाऱ्या आलम यांच्या या कर्तृत्वाची माहिती कळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गाैरव केला. त्याच्या या कृतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.