तो मृतदेह सना खानचा नाहीच, डीएनए टेस्ट रिपोर्टचे तथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 11:04 AM2023-09-09T11:04:13+5:302023-09-09T11:05:19+5:30
सोफ्यावरील रक्ताचे डाग मात्र सना यांचेच : आरोपींविरोधात मोठा पुरावा
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांकडून आरोपींविरोधात पुराव्यांची जुळवाजुळव सुरू आहे. मागील महिन्यांत पोलिसांना सना खान यांच्याशी मिळताजुळता एक मृतदेह मध्यप्रदेशमध्ये आढळला होता. मात्र डीएनए चाचणीचा अहवाल आला असून त्यात ‘निगेटिव्ह रिमार्क’ देण्यात आला आहे. याचाच अर्थ तो मृतदेह सना खान यांचा नाही. यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान कामय आहे. दरम्यान, पुराव्यांच्या बाबतीत पोलिसांना एक मोठे यश मिळाले असून सोफ्यावरील रक्ताचे डाग हे सना खान यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सना खान यांचा २ ऑगस्टरोजी आरोपी अमित साहू याने खून केला होता. त्याने घरीच त्यांना मारले व त्यानंतर हिरन नदीत मृतदेह फेकला. त्यावेळी पावसाचा जोर जास्त असल्याने नदीचे पात्र भरून वाहत होते. त्यामुळे सना यांचा मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी गेल्या. जबलपूर पोलिसांना हरदा नदीजवळील शिराली तहसीलच्या एका विहिरीत सना यांच्यासारख्या वर्णनाचा मृतदेह आढळला होता. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने चेहरा ओळखणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून तो मृतदेह कुटुंबीयांच्या डीएनएशी जुळलेला नाही.
दरम्यान, पोलिसांनी अमित साहूच्या घरातील सोफ्यावरील रक्ताची फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सहाय्याने चाचणी केली. तसेच डीएनए चाचणीदेखील करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असून सना खान यांच्या रक्ताशी ते रक्त जुळलेले आहे. अमित साहूच्या घरात सना खान यांचे रक्त असल्याची बाब स्पष्ट झाली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल मदने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामुळे आता पोलिसांजवळ आरोपींविरोधात मोठा पुरावा आहे.
नातेवाईकांना अगोदरच म्हटले होते, ती सना नाहीच
ज्यावेळी कुजलेल्या स्थितीत अनोळखी मृतदेह सापडला होता, तेव्हा तो सना यांच्या कुटुंबीयांना दाखविण्यात आला होता. नातेवाईकांनी मेहरूनिस्सा यांना मृतदेहाचे फोटो पाठविले होते. त्यात पायाचे बोट लहान असल्याचा दावा त्यांनी होता. सना कधीही नख वाढवत नव्हती व तिला नखं चावून खाण्याची सवय होती. मात्र मृतदेहाच्या हाताची नखे वाढलेली दिसून येत आहे. तिच्या हातात केवळ घड्याळ असायचे. ती कुठलाही धागा वगैरे बांधत नव्हती. त्यामुळे तो तिचा मृतदेह नसल्याचा दावा तेव्हाच त्यांच्या आईने केला होता.