‘त्या’ प्रेमीयुगुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; विषारी औषध प्राशन केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 09:42 PM2022-01-22T21:42:17+5:302022-01-22T21:42:54+5:30
Nagpur News घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाने शेतात जाऊन विषप्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला.
नागपूर : प्रेमीयुगुलाने घरून पळून येत शुक्रवारी (दि. २०) रात्री माेवाड (ता. नरखेड) परिसरातील गाेधनी फाटा येथील दिलीप बाेडखे यांचे शेत गाठले आणि तिथे दाेघांनीही विषारी औषध प्राशन केले. माेवाड येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती केले हाेते. त्या दाेघांचाही शनिवारी (दि. २१) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सूरज वगारे (१८, रा. महेंद्री, ता. नरखेड) व रसिका सुनील गायकवाड (१६) अशी मृतांची नावे आहेत. रसिका ही शिक्षणानिमित्त तिच्या मामाकडे नायगाव (ठाकरे) (ता. नरखेड) येथे राहायची. काही दिवसांपूर्वी त्यांची आपसात ओळख झाली आणि पुढे याच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची गावातील नागरिकांनाही माहिती हाेती.
दाेघेही शुक्रवारी दुपारी घरून पळून येत जलालखेडा (ता. नरखेड) येथे आले हाेते. तिथून ते ऑटाेने माेवाडला आले. माेवाड शहरापासून दीड किमीवर असलेल्या दिलीप बाेडखे यांच्या गाेधनी फाट्याजवळील शेतात गेले आणि तिथे दाेघांनीही विषारी औषध प्राशन केले. दरम्यान, ते दाेघेही उमरी येथील काही तरुणांना बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांनी दाेघांनाही माेवाड येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. प्रथमाेपचार केल्यानंतर दाेघांनाही नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान दाेघांचाही मृत्यू झाला.
कमी वय, लग्नाचा विचार आणि नैराश्य
प्रेमप्रकरणाची माहिती इतरांना झाल्याने दाेघांच्याही मनात बदनामीचे विचार घाेळत हाेते. यातून सुटका करण्यासाठी त्यांनी लग्न करण्याचा विचार केला हाेता. परंतु, दाेघेही अल्पवयीन असल्याने लगेच लग्न करणेही त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे दाेघांनाही नैराश्य आले हाेते. याच नैराश्येतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत त्यावर अंमल केला.
बेपत्ता असल्याची तक्रार
रसिका सायंकाळी घरी न आल्याने तिच्या मामाचे परिसरात शाेध घेतला. ती कुठेही आढळून न आल्याने मामाने जलालखेडा पाेलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नाेंदविली. त्यामुळे जलालखेडा पोलिसांनी भादंवि ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. काही वेळाने तिने तिच्या प्रियकरासाेबत विषारी औषध प्राशन केल्याची माहिती जलालखेडा पाेलिसांना मिळाली हाेती