पोटच्या चिमुकलीला विकून ‘सुखवस्तू’ विकत घेणारा नराधम कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 08:20 PM2022-04-21T20:20:32+5:302022-04-21T20:22:48+5:30
Nagpur News पोटच्या चिमुकलीला विकून आलेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टम विकत घेणारा नराधम पिता अखेर गुरुवारी कारागृहात पोहचला.
नागपूर - पोटच्या चिमुकलीला विकून आलेल्या पैशातून बाईक, म्युझिक सिस्टम विकत घेणारा नराधम पिता अखेर गुरुवारी कारागृहात पोहचला. उत्कर्ष दहिवले असे या नराधमाचे नाव आहे. पाचपावलीत राहणारा दहिवले मुळचा भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून तो प्लंबिंगची कामं करतो. तेथे कामधंदा मिळत नसल्याने गेल्या वर्षी दहिवले त्याच्या पत्नीसह नागपुरात आला. त्याच्या गर्भवती पत्नीवर उषा सहारे नामक महिलेची नजर गेली. ती
रामटेक मधील एका खाजगी अनाथआश्रमात काम करते. तिने दहिवले दाम्पत्याशी सलगी साधली. तुमची खायची सोय नाही, जर मुल जन्माला आले तर त्याचे संगोपण, तत्पूर्वी बाळंतपणाचा खर्च कसा करशील, अशी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर जन्माला बाळ आम्हाला दिले तर तुम्हाला एक लाख रुपये देऊ, असे उषा सहारे म्हणाली. काळजाचा तुकडा जन्मताच विकण्यासाठी दहिवलेच्या पत्नीने नकार देऊन उषा सहारेला हाकलून लावले. तर, अठरा विश्व दारिद्र्यात जगणाऱ्या दहिवलेने पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले आणि नवजात बाळ विकण्याचा साैदा केला. त्यानुसार, आरोपी दहिवलेने त्याच्या दोन महिन्यांच्या चिमुकलीला उषा सहारेच्या हवाली केले. त्या बदल्यात संबंधित दाम्पत्याकडून उषाने एक लाख रुपये घेतल्याचे सांगून ३०हजार रुपये स्वताचे कमिशन घेतले अन् ७० हजार रुपये दहिवलेच्या हाती दिले.
दारूड्या दहिवलेने या रकमेतून स्वतासाठी एक बाईक, म्युझिक सिस्टम तसेच दिवान विकत घेतला. उर्वरित पैसे त्याने दारूत उडवले. दरम्यान, जन्माला घातलेली चिमुकली हिरावली गेल्याने दहिवलेची पत्नी १५ एप्रिलला पाचपावली ठाण्यात पोहचली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सहारे तसेच दहिवलेला अटक केली. त्यांची पोलीस कोठडी मिळवली. या दरम्यान, सहारेकडून ३० हजार तर आरोपीने मुलगी विकून विकत घेतलेली बाईक, म्युझिक सिस्टम तसेच दिवान जप्त केला. गुरुवारी आरोपींची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोपींना कारागृहात डांबण्यात आले.
आणखी आरोपी वाढू शकतात
या प्रकरणात तूर्त सहारे आणि दहिवले हे दोघेच आरोपी असले तरी आणखी काही आरोपी वाढू शकतात, अशी माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. दोन महिन्यातील दुसरे प्रकरण नवजात बाळ विक्रीचे नागपुरात उघडकीस आलेले दोन महिन्यातील हे दुसरे प्रकरण होय. यापूर्वी लकडगंजमध्ये असेच एक प्रकरण उघडकीस आले होते. त्यात एक बोगस डॉक्टर मुख्य आरोपी निघाला होता.
----