देवेंद्र फडणवीसांचे कारसेवेतील पुराव्याचे ते छायाचित्र ‘लोकमत समाचार’ चे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 07:51 AM2024-01-23T07:51:36+5:302024-01-23T07:52:45+5:30
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्येतील कारसेवेत खरेच भाग घेतला होता का या मुद्द्यावर गेले काही महिने चर्चा सुरू आहे.
नागपूर : एकतीस वर्षांपूर्वी अयोध्येतील कारसेवेत सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एक्सवरून (आधीचे ट्विटर) पोस्ट केलेले छायाचित्र अन्य कुठल्या दैनिकातील नसून, ते लोकमत समाचारने २ डिसेंबर १९९२ च्या अंकात प्रकाशित केले असल्याचे स्पष्ट झाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्येतील कारसेवेत खरेच भाग घेतला होता का या मुद्द्यावर गेले काही महिने चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भातील पुरावा म्हणून त्यांनी एकतीस वर्षांपूर्वीचे नागपूर रेल्वे स्थानकावरील छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नागपूरमधील कारसेवकांचा जत्था अयोध्येकडे निघाला असतानाचे ते छायाचित्र असून, त्यात डावीकडील कोपऱ्यात फडणवीस दिसत आहेत. हे छायाचित्र लोकमतचे छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी टिपले होते आणि ते बुधवार, दि. २ डिसेंबर १९९२ च्या लोकमत समाचारच्या पहिल्या पानावर प्रकाशित झाले होते. नागपूर रेल्वेस्थानकावर कारसेवकांच्या उसळलेल्या गर्दीचा तसेच छायाचित्रकार म्हणून शंकर महाकाळकर यांचा स्पष्ट उल्लेख त्यावर आहे.