‘भावी मुख्यमंत्र्यां’चे ‘ते’ पोस्टर अन् फडणवीसांचे खडे बोल
By योगेश पांडे | Published: April 26, 2023 08:10 AM2023-04-26T08:10:00+5:302023-04-26T08:10:07+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे चक्क माजी मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असल्याचे पोस्टर लावण्यात आले. फडणवीस या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर पोस्टर लगेच काढण्यात आले.
योगेश पांडे
नागपूर : राज्यात मागील काही कालावधीपासून भावी मुख्यमंत्रिपदाच्या पोस्टर्सवरून चांगलेच राजकारण झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीतील पोस्टरबाजी थांबल्यावर आता भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी असे पोस्टर्स लावले आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे चक्क माजी मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असल्याचे पोस्टर लावण्यात आले. फडणवीस या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर पोस्टर लगेच काढण्यात आले.
भाजपचा स्थानिक पदाधिकारी असलेल्या बबलू गौतम याने ते पोस्टर लावले. त्यात ‘संपूर्ण महाराष्ट्राचा ज्यांनी विकास घडविला, फक्त आणि फक्त तेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार’ असे पोस्टरवर नमूद होते. सोशल माध्यमांमध्येदेखील हा फोटो आला. ही माहिती थेट देवेंद्र फडणवीस यांनादेखील कळाली. यावरून राजकारण तापून काय काय प्रतिक्रिया येऊ शकतात, याची जाण असल्याने फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत पदाधिकाऱ्याला ‘ऑन कॅमेरा’च सुनावले. ज्या कोणी लावले त्यांनी ते काढून टाकावेत. कमीत कमी भाजपमध्ये तरी असा मूर्खपणा कुणी करू नये, अतिउत्साही लोकं असतात, तेच असं करतात. मात्र, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यात नेतृत्त्वात आम्ही २०२४ च्या निवडणुका लढवू, असे स्पष्ट केले. यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने तडकाफडकी पोस्टर तर काढले व आता ‘क्या करे क्या ना करे’ अशा विचारात तो इतर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत आहे.