‘ती’ जागा नीरव मोदीची नाही, हिंमत असल्यास चर्चा करा; पवारांचे शिंदेंना चॅलेंज
By मंगेश व्यवहारे | Published: December 14, 2023 11:15 AM2023-12-14T11:15:31+5:302023-12-14T11:15:57+5:30
आमदार रोहित पवारांचे राम शिंदेंना आव्हान
नागपूर : कर्जत-जामखेड येथे औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित केलेली नीरव मोदी यांची असल्याचा माजी मंत्री राम शिंदे यांनी लावला आहे. हा आरोप खोडून काढत युवा आमदार रोहित पवार यांनी हिंमत असल्यास संबंधित जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिले.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड येथे औद्योगिक क्षेत्र विकसित व्हावे, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी त्यांनी पावसाळी अधिवेशनात आंदोलन केले होते. त्यानंतर आज गुरुवारी ते उपराजधानीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड येथे औद्योगिक वसाहत होण्याच्या मागणीचे जॅकेट घालून एंट्री केली. यासंदर्भात अधिक सांगताना ते म्हणाले,‘आम्ही संपूर्ण पाहणी करून ४५० हेक्टर जागा निश्चित केली आहे. तिथे मोठ्या कंपन्या याव्यात आणि त्या माध्यमातून २० हजार युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने दोन महामार्ग तयार करण्याच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे यश आले आहे. निश्चित केलेल्या जागेला कुणाचाही विरोध नाही.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीदेखील ती जागा योग्य असल्याचे म्हटले आहे. त्या जागेसंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव पारित केला आहे. केवळ या औद्योगिक क्षेत्रापोटी बागायती जमीन जाऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायतने केली होती. त्यानुसार तेवढी बागायती जमीन सोडण्यात आली आहे. परिणामत: राम शिंदे यांनी लावलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांनी हिंमत असेल तर कधीही यावे. मी ती जमीन नीरव मोदींची आहे की नाही याबाबत चर्चा करायला तयार आहे.’