'बर्निंग ट्रेन'चा तो व्हायरल झालेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ब्लॉक, रेल्वे अधिकाऱ्यांकडून इन्स्टाकडे तक्रार
By नरेश डोंगरे | Published: August 8, 2023 10:38 PM2023-08-08T22:38:44+5:302023-08-08T22:39:04+5:30
सोमवारी उशिरा रात्री हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तो नागपूरकडे समता एक्स्प्रेसचा असल्याचा दावा केला जात होता.
नागपूर : पांढुर्णाकडून येणाऱ्या समता एक्स्प्रेसला खालून आग लागल्याचे दिसत असलेला व्हिडीओ बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या संबंधाने मंगळवारी सायंकाळी इन्स्टाग्रामकडे तक्रार केल्यानंतर तो व्हिडीओ ब्लॉक करण्यात आला. सोमवारी उशिरा रात्री हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तो नागपूरकडे समता एक्स्प्रेसचा असल्याचा दावा केला जात होता.
सोमवारी रात्री निर्जन ठिकाणी काळोखात रेल्वेगाडी उभी आहे. या गाडीच्या खालून आगीच्या ज्वाळा आणि धूर निघत आहे आणि आतमध्ये प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे ते घाईगडबडीने खाली उतरत असल्याचे दिसत असलेला व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाला. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीने त्यावर इंग्रजीत 'मेजर फायर इन ट्रेन नंबर १२८०८ समता एक्स्प्रेस. समय रहते एक और बडा हादसा टल गया. निअर पांढुर्णा (एमपी) स्टेशन', असे लिहिले होते. त्यावर रात्रीची १०.४३ची वेळ टाकून एका प्रवाशानेच हा व्हिडीओ काढल्याचे सांगण्यात येत होते.
रात्री ११ वाजतानंतर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होऊ लागला. त्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले. अनेकांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे शहानिशा करण्यासाठी फोन लावले. मात्र, मध्यरात्र झाल्याने अधिकाऱ्यांचे फोनही 'नो रिप्लाय' होते. त्यामुळे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी कोंडी झाली. कर्मचाऱ्यांनी या संबंधाने बोलताना 'आम्ही सर्वत्र विचारणा केली. मात्र, पांढुर्णा ते नागपूरदरम्यान असा कुठलाही प्रकार आज घडला नाही', असे सांगितले. समता एक्स्प्रेसमध्ये तर नक्कीच असा काही प्रकार घडला नसल्याचे कर्मचारी सांगत होते.
दरम्यान, रात्रीपासून सर्वत्र अफवा पसरवणारा हा व्हिडीओ रेल्वेच्या अधिकाऱ्यांचीही झोप उडविणारा ठरला. या संबंधाने मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी आज लोकमतशी चर्चा करताना हा व्हिडीओ पूर्णत: बनावट असल्याचे सांगितले. त्या संबंधाने आमच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि विचारणा झाल्याचेही ते म्हणाले. रेल्वेकडून या व्हिडिओची तक्रार इन्स्टाग्रामकडे करण्यात आली असून, तो व्हिडिओ ब्लॉक करण्यात असल्याची माहितीही त्यांनी मंगळवारी रात्री लोकमतला दिली.
अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई
अशाप्रकारे समाजमाध्यमावर बनावट व्हिडीओ आणि खोटी माहिती टाकून जनमानसात अफवा पसरविणाराचा आधी शोध घेतला जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.