२६% टेरिफचा वस्त्रोद्योगाला बसणार सर्वाधिक फटका ! देशातील रोजगार निर्मितीवर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:08 IST2025-04-04T12:07:36+5:302025-04-04T12:08:44+5:30
Nagpur : दर वाढल्यास मागणी कमी होऊन निर्यात मंदावण्याची शक्यता

The 26% tariff will hit the textile industry the most! It will have an impact on employment generation in the country
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर सरासरी २६ टक्के टेरिफ लावला आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय वस्त्रोद्योगाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेत भारतीय कापडाचे दर वाढण्याची आणि त्यातून मागणी कमी होऊन निर्यात मंदावण्याची शक्यता नाकारता येत आहे. याचा परिणाम देशातील रोजगार निर्मितीवर होऊ शकतो.
भारतात सर्वाधिक रोजगार जिनिंग, प्रेसिंग, स्पिनिंग, टेक्सटाइल व गारमेंट इंडस्ट्रीजची साखळी देते. भारतातून अमेरिकेत दरवर्षी सरासरी ९.६ अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्त्र आणि पोशाखाची निर्यात केली जाते. अमेरिकेने डिस्काउंटेड रेसिप्रोकल टेरिफ लावला असला तरी भारतातून अमेरिकेत निर्यात होणारे वस्त्र व पोशाख सुटण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण भारत अमेरिकन वस्तूंवर सरासरी ३९ टक्के तर अमेरिका भारतीय वस्तूंवर पाच टक्के टेरिफ लावत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रॅम यांनी केला आहे.
अमेरिकेत दर्जा व किमतीमुळे बांगलादेशच्या कापडाला भरीव मागणी आहे. मात्र, बांगलादेशातील अराजकतेमुळे ही संधी भारताकडे चालून आली होती. या टेरिफमुळे तीदेखील मावळल्यागत झाली आहे. टेरिफमुळे भारतीय कापड व पोशाखाचे अमेरिकेत दर वाढल्यास मागणी कमी हाईल. त्यातून किमान १ ते २ अब्ज डॉलर किमतीच्या कापडाची निर्यात कमी होऊन हा कापड देशांतर्गत बाजारात राहिल्यास कापड उद्योगाला नुकसान होण्याची व त्यातून या उद्योगावर रोजगार कपात करण्याची वेळ ओढवण्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.
बांगलादेश व व्हिएतनामची स्पर्धा कमी
अलीकडच्या काळात व्हिएतनामच्या वस्त्रोद्योगाने उचल घेतली आहे. त्यांच्या चलनाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत खूपच कमी असले तरी त्यांच्या वस्त्र व पोशाख निर्यातीत भरीव वाढ झाली आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर ४६ टक्के तर बांगलादेश ३७ टक्के टेरिफ लावला आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतावरील टेरिफ कमी वाटत असला तरी देशाच्या आर्थिक प्रगती व रोजगार निर्मितीचा वेग विचारात घेता हा टेरिफ अधिक आहे. या दोन्ही देशांच्या वस्त्र व पोशाख निर्यातीवर परिणाम होणार असून, केंद्र सरकारने भारताचे स्थान पक्के करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करून मार्ग काढणे गरजेचे आहे.