देशी कट्ट्यासह पकडलेला आरोपी निघाला अट्टल वाहनचोर
By योगेश पांडे | Published: January 21, 2024 11:21 PM2024-01-21T23:21:05+5:302024-01-21T23:21:34+5:30
चौकशीदरम्यान त्याने ती दुचाकी इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली.
नागपूर : संशयावरून झडती घेण्यात आलेल्या एका दुचाकीस्वाराकडे देशी कट्टा आढळला होता व त्याच्या चौकशीदरम्यान तो अट्टल वाहनचोरी असल्याची बाब उघडकीस आली.. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
१८ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलिस ठाण्याचे पथक गस्तीवर होते. अंबाझरी बायपास मार्गावर एका वडाच्या झाडाजवळ एका व्यक्ती दुचाकीवर संशयितरीत्या उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता सीटखाली देशी कट्टा आढळला. त्याचा कुठलाही परवाना त्याच्याकडे नव्हता. तसेच त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रेदेखील नव्हती. पोलिसांनी आरोपी सर्वे ऊर्फ टिटू चंद्रशेखर परिहार (२०, पांढराबोडी) या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दुचाकीदेखील जप्त केली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
चौकशीदरम्यान त्याने ती दुचाकी इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने अथर्व नरेश भागवत (१९, अंबाझरी टेकड़ी) याच्यासोबत आणखी नऊ दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या एमएच २९ एझेड ०७७० , एमएच ३१ एझेड ३१२९, एमएच ३१ एफव्ही ९७९३, लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली एमएच ४९ के ०७६०, राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली एमएच ३१ ईएल ७६७८ व इतर तीन दुचाक्या जप्त करण्यात आल्या.पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, कुणाल शेडमाके, राजेश सोनवाने, मूनिंद्र, अंकूश घटी, अमित भुरे, रोमित राउत, विक्रमसिंग ठाकूर, आशिष जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.