महिलेला छेडताना पकडला तोच बलात्कारातील आरोपी निघाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 01:27 PM2023-10-17T13:27:16+5:302023-10-17T13:27:46+5:30

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीच्या धाकावर केला होता अत्याचार : १२ दिवसांपासून सुरू होता शोध : आरोपीवर आधी चोरीचा गुन्हाही

The accused in the rape turned out to be the one who was caught while teasing the woman | महिलेला छेडताना पकडला तोच बलात्कारातील आरोपी निघाला

महिलेला छेडताना पकडला तोच बलात्कारातील आरोपी निघाला

नागपूर : हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयात जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर कुऱ्हाडीचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात अखेर नागपूर पोलिसांना यश आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा विनयभंग करताना तो नजरेत आला व त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडले. चौकशीदरम्यान तोच अत्याचार करणारा नराधम असल्याची बाब समोर आली. मागील १२ दिवसांपासून तो फरार होता.

प्रफुल्ल (२३) असे आरोपीचे नाव असून तो बुटीबोरी येथील निवासी आहे. ४ ऑक्टोबर रोजी हिंगणा पोलिस ठाण्यांतर्गत एका झुडपात १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर अत्याचार झाला होता. ती विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना त्याने तिला मागून पकडले व कुऱ्हाडीचा धाक दाखवत अत्याचार केला. विद्यार्थिनीचा फोन सुरू असल्यामुळे तिच्या बहिणीला हा प्रकार कळाला व तिने महाविद्यालयात याची माहिती दिली. कर्मचारी धावून आले असता आरोपी फरार झाला. घटनास्थळावरून पोलिसांना आरोपीची कुऱ्हाड सापडली होती. पोलिसांकडून मोठी तपासयंत्रणा राबविण्यात आली होती.

रविवारी रात्री अकरा वाजता आरोपी प्रफुल्ल हा बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत होता. तो झुडपांच्या दिशेने जाणाऱ्या महिलांचा शोध घेत होता. यावेळी त्याने एका महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. बेलतरोडी पोलिस ठाण्याचे बीट मार्शल तातडीने तेथे पोहोचले व त्यांनी प्रफुल्लला ताब्यात घेतले. त्याला पोलिस ठाण्यात आणून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची व संभ्रमित करणारी उत्तरे देत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झुडपात का फिरत होता हे तो पोलिसांना सांगू शकला नाही. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त मुमक्का सुदर्शन, अनुराग जैन, विजयकांत सागर पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता प्रफुल्लने अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची कबुली दिली.

पोलिसांकडून इतर माहिती गुप्त

प्रकरण संवेदनशील असल्याचा दावा करत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपीबाबत आणखी माहिती देण्यास नकार दिला. आरोपीविरोधात दोन वर्षांअगोदर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

तीन महिने जंगलात तळ ठोकून

हिंगणा ते बेलतरोडी दरम्यान पसरलेल्या ११ किमी झुडपात प्रफुल्ल तीन महिन्यांपासून राहत आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई आणि भावाशी भांडण झाल्याने तो घर सोडून निघाला व तेव्हापासून तो झुडपातच राहतो. तो भंगार विक्रेत्यांना माल विकून गुजराण करतो. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड त्याने एका ठिकाणाहून चोरली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पाचशेहून अधिक पोलिस अधिकारी-कर्मचारी तपासात

या प्रकरणाच्या तपासात हिंगणा पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, सायबर सेल मिळून सुमारे पाचशे अधिकारी व कर्मचारी तपासात लागले होते. तपासादरम्यान झुडपांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून तपास करण्यात आला. तसेच अडीचशेहून अधिक जणांची झाडाझडती घेण्यात आली. ऑनलाइन कुऱ्हाड खरेदी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके अन्य राज्यात पाठवण्यात आली. असे असूनही आरोपींशी संबंधित कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. अखेर एका महिलेच्या समयसूचकतेमुळे आरोपीचा शोध लागला.

पाच लाखांचे बक्षीस कुणाला?

शहर पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. संबंधित महिलेच्या सतर्कतेमुळेच प्रफुल्लला अटक करण्यात यश आले आहे. आता तिला पाच लाखांचे बक्षीस मिळणार की तपास करणाऱ्या पथकाला रिवॉर्ड देणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: The accused in the rape turned out to be the one who was caught while teasing the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.