चेंबरमध्ये प्रशासकाची राजवट संपली; आता व्यापाऱ्यांचे राज्य
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 2, 2024 11:04 PM2024-04-02T23:04:47+5:302024-04-02T23:05:08+5:30
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाचा निर्णय
नागपूर : विदर्भातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सवर असलेली प्रशासकाची नियुक्ती अवैध ठरवत व्यापाऱ्यांची कार्यकारिणी पूर्ववत राहणार असल्याचा निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाने सदस्य (तांंत्रिक) प्रभात कुमार आणि सदस्य (न्यायिक) व्ही.जी. बिष्ट यांनी मंगळवारी दिला.
याआधी चेंबरच्या कार्यकारिणीवर आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या सदस्यांनी कंपनी कायद्यांतर्गत नागपूर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सची कार्यकारिणी बरखास्त करीत ३१ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्ली येथील यू.एन. नाहटा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
न्यायाधिकरणाच्या निर्णयाने चेंबरच्या आधीच्या कार्यकारिणीला पूर्ण अधिकार बहाल झाले आहेत. त्यामुळे चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि अन्य पदाधिकारी बुधवारी चेंबरचा कार्यभार स्वीकारणार आहेत. अश्विन मेहाडिया म्हणाले, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या निर्णयाने व्यापाऱ्यांचा आणि सत्याचा विजय झाला आहे. व्यापाऱ्यांची खरी बाजू पुढे आली आहे. बुधवारी कार्यभार स्वीकारणार असून व्यापाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहू असं त्यांनी सांगितले.