सुटीच्या दिवशीही महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम
By आनंद डेकाटे | Published: July 17, 2024 06:17 PM2024-07-17T18:17:26+5:302024-07-17T18:18:52+5:30
Nagpur : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केली निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेअंतीही मागण्यांची पूर्तता न झाल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम असून, बुधवारी आषाढी एकादशीची शासकीय सुटी असतानाही नागपूर जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना नागपूरच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होऊन निदर्शने केली.
महसूल कर्मचारी संघटनेने पुकालेल्या या बेमुदत कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील साडे पाचशेवर महसूल सहाय्यक, अव्वल कारकुन यांनी शंभर टक्के सहभाग नोंदविल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक कागदपत्रे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांची कामे रखडली असून, याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मागील दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाला गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारा कोट्यवधीचा महसूलही या आंदोलनामुळे बुडत आहे.
बुुधवारी शासकीय सुटी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राज ढोमणे व नागपूर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिदोडकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.