‘कृषी अवजारे पुरवठा’ घोटाळा थंडबस्त्यातच
By आनंद डेकाटे | Published: July 8, 2024 07:19 PM2024-07-08T19:19:04+5:302024-07-08T19:19:55+5:30
Nagpur : समाजकल्याण विभाग कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजकल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना कृषी अवजारे संच पुरवठा करण्यात आला होता. कृषी अवजारे बचत गटांच्या खात्यातून रक्कमही उचलण्यात आली होती. सदर प्रकरण चव्हाट्यावर येताच मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी चौकशी करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते; परंतु सध्या तरी या प्रकरणाची सखोल चौकशीच थंडबस्त्यात आहे. त्यामुळे विभाग या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
समाजकल्याण विभागामार्फत २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचतगटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखली. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला. प्रत्येक महिला बचतगटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. सर्व तालुक्यांतील महिला बचत गटांची यासाठी निवड करण्यात आली; परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. याबाबतची तक्रार महिला बचत गटाने विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली. त्यांनी संबंधित तक्रार समाजकल्याण विभागाकडे वर्ग केली.
मिळालेल्या माहितीनुसार, साहित्य पुरवठा करण्याचे काम साई या कंपनीला देण्यात आले होते. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाजकल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याची माहिती समोर आली. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले; परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली. काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद आहेत. काही प्रमाणपत्रांवर मागील एक-दोन वर्षांपूर्वीची तारीख आहे.
त्यामुळे बचत गट बोगस तयार करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दोन ते तीन तालुक्यांच्या चौकशीतच ही बाब समोर आली. सर्व जिल्हाभर हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. गत काही महिन्यांपासून चौकशी थंडबस्त्यात असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.