जोरात वाजताहे जीर्ण झालेल्या रेल्वे पुलांच्या खतऱ्याची घंटी; विकासकामांचा रेल्वे महाव्यवस्थापकांचा दावा फोल
By नरेश डोंगरे | Published: November 27, 2022 10:27 PM2022-11-27T22:27:36+5:302022-11-27T22:29:20+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा करून महाव्यवस्थापक मुंबईत पोहचत नाही तोच ईकडे बल्लारपूर रेल्वेस्थानकावरील ओव्हर ब्रीज कोसळला.
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा करून महाव्यवस्थापक मुंबईत पोहचत नाही तोच ईकडे बल्लारपूर रेल्वेस्थानकावरील ओव्हर ब्रीज कोसळला. त्यामुळे दुर्घटनेचे हादरे चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या रेल्वे प्रशासनाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर, ठिकठिकाणच्या जीर्ण झालेल्या रेल्वे पुलांच्या खतऱ्याची घंटी पुन्हा एकदा जोराने वाजू लागली आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी २५ नोव्हेंबरला नागपूर रेल्वे विभागातील इटारसी, बैतूल, आमला आणि परासिया क्षेत्रांत रेल्वे पूल, रेल्वे लाईन, सिग्नल सिस्टमचे निरीक्षण केले. नंतर गँगमनपासून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांशी चर्चा करून त्यांनी या भागातील विकासकामांचा आढावा घेतला. काय कमी, काय जास्त, कोणत्या अडचणी त्याचीही माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
दरम्यान, त्यांनी कालाखार घोडाडोंगरी रेल्वेमार्गावर १३० किलोमीटर प्रतितास वेगाने जीएम एक्सप्रेस दाैडवली. त्यानंतर रात्री ते नागपुरात पोहचले. त्यांनी येथे पत्रकारांशी चर्चा करताना नागपूर विभागात रेल्वे लाईन, सिस्टम अपग्रेडेशन आणि पुलांचे मोठ्या प्रमाणावर (विकास) कामे झाल्याचे पत्रकारांना सांगितले. शनिवारी सकाळी महाव्यवस्थापक त्यांच्या ताफ्यासह मुंबईला पोहचले आणि एक दिवस लोटत नाही तोच आज रविवारी (२७ नोव्हेंबर) बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पुल पडल्याची दुर्घटना घडली. यामुळे मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या दाव्यातील फोलपणा आहे. सोबतच नागपूरसह वेगवेगळ्या ठिकाणच्या रेल्वे पुलांच्या अवस्थेचा मुद्दाही चर्चेला आला आहे.
नागपुरात कधीही घडू शकते दुर्घटना
नागपूरात सध्या सर्वात वाईट अवस्था असलेल्या रेल्वे पुलांमध्ये अजनीच्या रेल्वे पुलाची गणना होते. अजनीचा हा रेल्वे पुल ब्रिटिशकालिन आहे. तो वाहतुकीस धोकादायक असल्याचे नेहमीच ओरडून ओरडून सांगितले जाते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून त्याची पाहिजे त्या गांभिर्याने आणि तत्परतेने दखल घेतली गेलेली नाही. अजनी पुलाप्रमाणेच लोहापुल, धंतोली आणि नरेंद्रनगरच्या रेल्वेपुलांचीही स्थिती धोकादायक आहे. या पुलांवरून कधीही दुर्घटना घडू शकतात.
थेट रेल्वेमंत्रीच आले होते अजनी पुलावर
दहा वर्षांपूर्वी तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी अजनी पुलाची स्थिती दाखवण्यासाठी थेट तत्कालिन रेल्वेमंत्र्यांनाच या पुलावर आणले होते. त्यावेळी रेल्वे मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. अधिकाऱ्यांनी थातुरमातूर कारवाई केली. या संबंधाने वेळोवेळी होणाऱ्या तक्रारी आणि नागरिकांची ओरड बेदखल केली जात असल्याचा आरोप भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी केला आहे.
गंभीर जखमींना एक लाखाची मदत
बल्लारपूरच्या रेल्वेपुलावरून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला प्रत्येकी एक लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५०हजार रुपयांची आर्थिक मदत रेल्वेतर्फे देण्यात येणार आहे. जखमीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च रेल्वे तर्फे केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (मुंबई) यांनी लोकमतशी बोलताना दिली.