सीताबर्डीतील हॉकर्स संतप्त, कारवाईच्या विरोधात रस्त्यावर; दोन दिवसांपासून तणाव

By मंगेश व्यवहारे | Published: November 7, 2023 03:07 PM2023-11-07T15:07:42+5:302023-11-07T15:11:22+5:30

अतिक्रमण कारवाईच्या तगाद्यामुळे व्यवसायात अडथळा

The angry hawkers in Sitabardi stayed on the streets against the action taken by NMC, a tense situation | सीताबर्डीतील हॉकर्स संतप्त, कारवाईच्या विरोधात रस्त्यावर; दोन दिवसांपासून तणाव

सीताबर्डीतील हॉकर्स संतप्त, कारवाईच्या विरोधात रस्त्यावर; दोन दिवसांपासून तणाव

नागपूर : दिवाळी तोंडावर व्यवसाय करण्यासाठी सीताबर्डी मेन रोडवरील हॉकर्स सज्ज झाले असताना, महापालिकेच्या प्रवर्तन विभागाकडून सातत्याने अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. सोमवारी मनपा पथकाने व्हेरायटी चौकापासून हॉकर्सकडील परवान्याची तपासणी सुरू केली. त्यामुळे संतप्त हॉकर्सने सहायक आयुक्तांशी धक्काबुक्की केली. मंगळवारी दुपारी पुन्हा अतिक्रमणचे पथक सीताबर्डीत धडकताच संतप्त झालेल्या हॉकर्सने कारवाईच्या विरोधात रस्त्यावरच ठिय्या मांडला. 

हॉकर्सच्या घोषणाबाजीमुळे सीताबर्डी पोलीसही घटनास्थळावर पोहचले होते. यावेळी नागपूर फेरीवाला व फुटपाथ दुकानदार संघटनेचे सरचिटणीस रज्जाक कुरेशी म्हणाले की आम्ही ३० वर्षापासून येथे व्यवसाय करतो. या रस्त्यावर ३४४ हॉकर्स आहेत. यातील ८४ लोकांना लायसन्स दिले आहे. तर इतर हॉकर्सकडे महापालिकेचे कर्मचारी येऊन त्यांची  नोंदणी करून गेले आहे.  त्यांना परवान्यासाठी पावतीही दिली आहे. यासंदर्भात आम्ही मनपा आयुक्तांना भेटून परवाने लवकरात लवकर देण्याची मागणी केली होती. त्यांनी १५ दिवसांत देतो असे सांगितले होते. परंतु ३ महिने लोटूनही परवाने मिळालेले नाही. ज्या हॉकर्सकडे नोंदणीची पावती आहे आणि महापालिकेच्या चुकीमुळे परवाने मिळालेले नाही. त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी केली.  

- आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे

सणासुदीच्या काळात व्यवसाय करण्यासाठी आम्ही कर्ज काढून माल भरला आहे. सीताबर्डीतील बिल्डर्सच्या इशाऱ्यावर अतिक्रमण पथकाचे अधिकारी आमच्यावर कारवाई करीत आहे. अतिक्रमण कारवाईत सामान घेऊन जातात. सामानाची नासधूस होते. या कारवाईमुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे हॉकर्स अविनाश तिरपुडे म्हणाले.

Web Title: The angry hawkers in Sitabardi stayed on the streets against the action taken by NMC, a tense situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.