'बाप्पा मोरया’च्या गजरात घरोघरी गणरायाचे आगमन; मंडळांच्या गणेशभक्तांचा उत्साह शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 01:00 PM2022-09-01T13:00:37+5:302022-09-01T13:03:43+5:30
दे धडम धडम धम ढोल वाजला, गणपती आपला दणक्यात आला!
नागपूर : नागपुरात जणू गणपत्ती बाप्पा चितारओळीतच अवतरित होतात आणि नंतर घरोघरी भक्तांचा पाहुणचार घेण्यास प्रयाण करतात, अशी धारणाच झाली आहे. सगळे लहान - मोठे मूर्तिकार, विक्रेत्यांचे माहेरघर असलेल्या महालातील चितारओळीमध्ये तयार होणारे बाप्पाच आपल्या घरी, मंडळांमध्ये हवे असतात आणि त्यामुळे दरवर्षी या भागात श्रीगणेश चतुर्थीच्या काळात प्रचंड वर्दळ असते. बाप्पाच्या पार्थिव मूर्तींची स्थापना होणाऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला तर मेळाच भरतो.
यंदा तर दोन वर्षांनंतर होणाऱ्या निर्बंधमुक्त वातावरणातील श्रीगणेशोत्सवामुळे भक्तांच्या गर्दीत प्रचंड वाढ झालेली दिसली. सकाळपासूनच ढोल - ताशा पथक, बॅण्डच्या दणादण आवाजात लहान - मोठे बाप्पा आपापल्या भक्तांकडे प्रयाण करण्यास सज्ज झाले आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ असा एकच जल्लोष झाला. वेगवेगळ्या पथकांद्वारे चितारओळीकडे वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या मार्गांवर ‘दे धडम धडम धम ढोल वाजला आणि गणपती आपला दणक्यात आला’ अशी भावना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.
चितारओळीच नव्हे तर शहरातील ज्या ज्या भागात मूर्ती साकारल्या जातात, त्या भागातून वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या गणपतींची जणू यात्राच भरली होती की काय, असा भास होत होता. लहान - मोठे रस्ते असो वा गल्लीबोळ सगळ्याच ठिकाणी अबीर, गुलाल उधळत हा सोहळा साजरा केला जात होता. बाप्पांच्या विहंगम मूर्ती नजरेस पडताच रस्त्याने जाणारे - येणारे लोक जागीच थबकत होते आणि हळूच हात जोडत प्रार्थना करत असल्याचे चित्र होते. मंडळांचे मोठे गणपती वगळता कौटुंबीक गणपती नेण्यास आलेल्या भाविकांचा जल्लोषही कुठेच कमी नव्हता. घरातल्या गणपतीच्या स्वागतासाठीही ढोल - ताशा पथकाचे संयोजन करण्यात आल्याचे चित्र भावविभोर करणारे होते.
गणपती तुमचा अन् भावना आमच्या
- अनेकांच्या घरी गणपतीची स्थापना होत नाही. त्याची अन्यान्न कारणे असतात. परंतु, बाप्पाचे आगमन होताना दिसताच अनेकांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष होत होता. गणपती तुमच्या घरी जात असला तरी आमच्याही भावना त्याच्याशी निगडीत असल्याचा भाव अशा तऱ्हेने व्यक्त होत होता.
मूर्तींचे विहंगम स्वरूप
- श्रीगणेशाच्या मूर्ती लहान असो वा मोठ्या... त्यांच्या विभिन्न शैली मोहक ठरत होत्या. बालगणेश, सिंहासनाधिश, शिवशंकराच्या स्वरूपात तांडव करताना त्रिशूलधारी गणेश, बटू गणेश, फेटा व मुकुटधारी गणेश, रौद्ररूपी गणेश, बालाजी स्वरूपातील गणेश, अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीसोबत असलेला गणेश... अशी विविध रूपे बघून बाप्पाला बघण्याचा मोह भक्तांना आवरता आवरेना, अशी स्थिती होती.
पावसालाही मोह आवरेना
- यंदा पाऊस जोरदार झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. अधामधात शहराच्या काही भागात पाऊस सरी कोसळत आहेत. परंतु, त्या औटघटकेच्याच ठरत आहेत. बुधवारीही श्रीगणेशाच्या आगमनप्रसंगी पावसालाही बाप्पाच्या दर्शनाचा मोह आवरला नसावा म्हणून पावसाने हजेरी लावली. पावसाने मूर्तींना धोका निर्माण होऊ नये म्हणून मेनकापडांची तयारीही करण्यात आली होती.
पाेलिसांचा ताफाही होता सज्ज
- श्रीगणेशाच्या आगमनप्रसंगी कोणताही अनुचित प्रसंग निर्माण होऊ नये आणि कठीण प्रसंगात तो तत्काळ आवरता यावा म्हणून पोलीस प्रशासनही मोठ्या फाैजफाट्यासह शहराच्या विविध भागात सज्ज होते. रस्ता सुरळीत करणे, गर्दी निर्माण झाली तर ती तत्काळ निस्तारणे, श्री गणपतीचा रस्ता मोकळा करणे आदी कार्य कुशलनेते पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणा पार पाडत होते.