समृद्धी महामार्गाचे ट्रॅव्हल्सवाल्यांनाही आकर्षण, गणित जुळविण्यात गुंतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 11:57 AM2022-12-06T11:57:53+5:302022-12-06T12:09:16+5:30
टोलची उत्सुकता, वेळ आणि डिझेल वाचेल : व्यवसायवाढीची अपेक्षा
नागपूर :समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नागपूर ते मुंबईचे अंतर कमी करणाऱ्या समृद्धीमुळे नेहमीच मुंबईवारी करणाऱ्यांना भारी आकर्षण आहे. त्यांच्याप्रमाणेच खासगी प्रवासी बस चालविणाऱ्या (ट्रॅव्हल्सवाल्यांनाही) कधी एकदाचे समृद्धीचे उद्घाटन होते आणि कधी या महामार्गावर बस चालवितो, असे झाले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शिर्डीपर्यंतचे काम पूर्ण झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला त्याचे उद्घाटन होणार आहे. समृद्धीवरून प्रवास करून अवघ्या आठ तासांत मुंबई तर साडेचार ते पाच तासांत शिर्डी गाठता येणार आहे. अर्थात, जलदगती रेल्वेगाडीपेक्षाही कमी वेळ कार किंवा ट्रॅव्हल्सने लागणार आहे. त्यामुळे टॅक्सी व्यावसायिक खास करून ट्रॅव्हल्सवाल्यांना समृद्धीचे कमालीचे आकर्षण आहे. ते आपले गणित जुळविण्यात गुंतले आहेत. किती टोल भरावा लागेल, किती वेळ आणि डिझेल वाचेल, असे त्यांचे गणित आहे.
नागपुरातून पुणे, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक आदी शहरांत मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स चालतात. ट्रॅव्हल्स संचालक सुभाष तिवारी, खिजर अली यांच्या मते, सध्या पुण्याला जाण्यासाठी १४ तर औरंगाबादला जाण्यासाठी साधारणत: ८ तास लागतात. समृद्धी महामार्गाने पुण्याला जाताना केवळ ८ ते ९ तास तर औरंगाबदला जाण्यासाठी फार तर पाच ते सहा तास लागतील.
प्रवासी ट्रॅव्हल्सकडे धाव घेतील
मोठ्या प्रमाणात डिझेल वाचेल. त्यामुळे एकीकडे डिझेल कमी जळेल. तो आर्थिक फायदा होईल आणि दुसरीकडे वेळ वाचणार असल्याने प्रवासी मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सने प्रवास करतील. त्यामुळे व्यवसायाला भरभराट येईल, असा विश्वास ट्रॅव्हल्सच्या संचालकांना आहे.