बंदी असलेल्या पीओपी गणेश मूर्ती शहराबाहेर रोखणार
By गणेश हुड | Published: July 7, 2023 06:47 PM2023-07-07T18:47:06+5:302023-07-07T18:47:45+5:30
Nagpur News यावर्षी नागपूर शहरामध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची कुठेही विक्री होऊ नये यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहे. पीओपी मूर्ती दाखल होण्यापूर्वीच रोखण्यात येणार आहे.
गणेश हूड
नागपूर : यावर्षी नागपूर शहरामध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची कुठेही विक्री होऊ नये यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहे. पीओपी मूर्ती दाखल होण्यापूर्वीच रोखण्यात येणार आहे.
नियोजनासाठी मनपाने शहरातील पारंपरिक मूर्तिकार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमिवर शुक्रवारी मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पोलिस प्रशासन, शहरातील मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक पोलिस आयुक्त नितीन जगताप, पोलिस निरीक्षक नरेंद्र वानखेडे, विभागीय अधिकारी (स्वच्छता) रोहिदास राठोड, यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर शहरात पीओपी मूर्तींची निर्मिती, विक्री आणि खरेदी यावर पूर्णत: बंदी असल्याची माहिती गजेंद्र महल्ले यांनी दिली. पीओपी मूर्तींची विक्री करणाऱ्यांवर मनपा पोलिस प्रशासन, शहरातील पारंपरिक मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कारवाई करणार आहे. पीओपी मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असून अशा मूर्ती शहरात येण्यापासून रोखण्याकरिता केंद्रीय समिती गठित केली जाणार आहे.
पथक कारवाई करणार
शहरात पीओपी मूर्तींची विक्री आणि खरेदी टाळण्यासाठी शहरात पथकाव्दारे कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये मूर्तिकार बांधवांची नोंदणी केली जाईल. नोंदणीसाठी मूर्तिकारांना १० ते १५ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये मनपाद्वारे गठीत मूर्तिकार महासंघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीचे पथक नोंदणी अर्जांची छाणनी करेल व मूर्तिकाराच्या नोंदणीबाबत निर्णय घेईल. मूर्ती विक्रेत्यांकरिता देखील हिच प्रणाली वापरण्यात येणार असल्याचेही गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.