‘बारामती ॲग्रो’ वादात; कायदेशीर कारवाई होणार, सहकार अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 10:11 AM2022-12-27T10:11:38+5:302022-12-27T10:12:11+5:30
सहकार विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत जी चौकशी केली, त्यात कारखान्याला क्लीन चिट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे बंधू आणि आ.रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बारामती ॲग्रो लिमिटेड या कारखान्याचे ऊसगाळप राज्य सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीआधीच सुरू केल्याप्रकरणी दिशाभूल अहवाल दिल्याबद्दल विशेष लेखा परीक्षक (वर्ग एक) अजय देशमुख यांना सोमवारी निलंबित करण्यात आले.
या कारखान्याने अनुमती नसल्याच्या काळात किती ऊसगाळप केले, त्यानुसार टनामागे आर्थिक दंड करणे आणि कारखान्याच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे सहकार विभागात प्रस्तावित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत राज्यातील गाळप हंगाम हा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या आधी गाळप केल्यास कारवाई केली जाईल, असे बैठकीनंतर साखर आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले होते.
रोहित पवार- राम शिंदे सामना
आ.रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे आमदार आहेत आणि त्यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. बारामती ॲग्रोविरुद्ध शिंदे यांच्या तक्रारीला या राजकीय वादाची किनार असल्याचे म्हटले जाते.
देशमुखांचा निष्कर्ष चुकीचा
राज्य भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बारामती ॲग्रोने पाच दिवस आधीच म्हणजे १० ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्याची लेखी तक्रार दिली होती. त्यावर अंकेक्षक अजय देशमुख यांनी चौकशी करून, गाळप मुदतीआधी सुरू केलेले नव्हते, असा निष्कर्ष काढला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि पेन ड्राइव्हमधील माहितीच्या आधारे शिंदे यांनी पुन्हा तक्रार केली. चौकशीअंती देशमुख यांचा अहवाल खोटा असल्याचे सिद्ध झाले.
अंकेक्षक अजय देशमुख यांनी चुकीचा अहवाल दिल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचे आदेश मी दिले आहेत. कारखान्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. - अतुल सावे, सहकारमंत्री.
नियमांची मोडतोड करून गाळपाबाबत मनमानी करणाऱ्या बारामती ॲग्रो लि.च्या संचालक मंडळाविरुद्धही कारवाई झाली पाहिजे. दिशाभूल करणारा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित केले याचे स्वागतच आहे. - आ.राम शिंदे, उपाध्यक्ष, प्रदेश भाजप
आम्ही मुदतीआधी गाळप केले नाही. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत जी चौकशी केली, त्यात कारखान्याला क्लीन चिट दिली. मुदतीआधी गाळप झाले नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यानंतर, कोणती चौकशी झाली आणि त्यातील निष्कर्ष काय, याची मला कल्पना नाही. - राजेंद्र पवार, अध्यक्ष, बारामती ॲग्रो लि.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"