नाकावाटे घेण्याच्या ‘बूस्टर डोस’ला आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 08:00 AM2023-05-03T08:00:00+5:302023-05-03T08:00:11+5:30
Nagpur News बहुचर्चित नाकावाटे घेण्यात येणाऱ्या ‘इन्कोव्हॅक’ या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र ही लस ६० वर्षांवरील पात्र नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने झालेल्यांनाच ‘बूस्टर डोस’च्या स्वरूपात दिला जाणार आहे.
नागपूर : बहुचर्चित नाकावाटे घेण्यात येणाऱ्या ‘इन्कोव्हॅक’ या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र ही लस ६० वर्षांवरील पात्र नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने झालेल्यांनाच ‘बूस्टर डोस’च्या स्वरूपात दिला जाणार आहे. या लसीचे ५०० डोस नागपूर जिल्ह्याला मिळाले. यातील २५० डोस शहराला तर २५० डोस ग्रामीणला उपलब्ध करून देण्यात आले.
भारत बायोटेकच्या या नेझल व्हॅक्सिन ‘इन्कोव्हॅक’ला २३ डिसेंबर २०२२ रोजी केंद्राने परवानगी दिली. तज्ज्ञाच्या समितीने या लसीला १८ वर्षांवरील नागरिकांवरील वापरासाठी व बुस्टर डोस म्हणूनच घेण्याला मंजुरी दिली. सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयात मिळणार होती. परंतु मागील पाच महिन्यात नागपूर जिल्ह्यात ही लस कुठेच उपलब्ध झाली नाही. आरोग्य विभागाने आता बुधवारपासून ही लस उपलब्ध करून दिली आहे.
-नागपुरात झाली होती मानवी चाचणी
भारत बायोटेक कंपनीची नाकावाटे घेणाऱ्या ‘नेझल व्हॅक्सिन’ मानवी चाचणीचा पहिला टप्पा नागपुरात पार पडला. गिल्लुरकर हॉस्पिटलमध्ये डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांच्या मार्गदर्शनात ही चाचणी यशस्वी पार पडली. ५० स्वयंसेवकांवर ही चाचणी झाली होती.
-नाकातील पडद्यावरच ‘इम्युनिटी’
डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले, ‘नेझल व्हॅक्सिन’चा मानवी चाचणीत ‘साईड इफेक्ट’ दिसून आले नाहीत. उलट चांगले रिझल्ट आलेत. कोरोनाचा विषाणू सामान्यत: नाकातून शरीरात प्रवेश करतो. या लसीमुळे नाकातील पडद्यावरच (लोकल) इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि विषाणूपासून बचाव करण्यास मदत करते.
-कोरोना लसीची भीती दूर
अनेकांमध्ये दंडावर देणाऱ्या कोरोना लसीची भीती होती. आता ही लस नाकावाटे दिला जाणार असल्याने ही भीती दूर होणार आहे. डोस थेट श्वासोच्छवासाच्या मार्गांमध्ये पोहोचवणे हे या मागील उद्दिष्ट आहे.
-शहरात केवळ महाल केंद्रावरच लस
मागील एक महिन्यापासून शहरातील लसीकरण केंद्र बंद आहेत. आता ‘इन्कोव्हॅक’ लसीचे २५० डोस मिळाल्याने बुधवारपासून केवळ स्व. प्रभाकर दटके, महाल रोगनिदान केंद्रावरच ही लस बुस्टरच्या स्वरूपात मिळणार आहे.
-ग्रामीणमध्ये उद्यापासून लसीकरण
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांनी सांगितले, ग्रामीणला ‘इन्कोव्हॅक’लसीचे २५० डोस मिळाले. गुरुवारपासून सर्व तालुक्याचा एकाच केंद्रावर ही लस उपलब्ध करून दिले जाईल.
- ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच का?
मनपाचे वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले, सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. मात्र, जे मृत्यू झालेत त्यात सर्वाधिक मृत्यू ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. यामुळे सध्यातरी ‘इन्कोव्हॅक’ही लस याच वयोगटात दिला जाणार आहे.