‘माझी पत्नी कोठे आहे ?’ असे विचारून मुलगा-आईवर केला चाकूने वार
By दयानंद पाईकराव | Published: February 15, 2024 07:53 PM2024-02-15T19:53:43+5:302024-02-15T19:54:06+5:30
आरोपीस अटक : घरात घुसल्यामुळे हटकल्याने आरोपीचे कृत्य
दयानंद पाईकराव, नागपूर : पत्नीसोबत भांडण झाल्यामुळे ती दुसऱ्याच्या घरात लपली असावी असा विचार करून आरोपी एका महिलेच्या घरात घुसला. महिलेने आणि तिच्या मुलाने हटकले असता आरोपीने दोघांवर चाकुने वार करून त्यांना जखमी केले. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी १३ फेब्रुवारीला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
दिनेश उर्फ भद्या शंकर आकोडे (३२, रा. भिमनगर एमआयडीसी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मोहिनी राजेश तिवारी (४५) आणि त्यांचा मुलगा रोहित तिवारी (२६) दोघे रा. वेशालीनगर हिंगणा रोड असे चाकुने वार केल्यामुळे जखमी झालेल्या महिला व तिच्या मुलाचे नाव आहे. आरोपी दिनेशचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. आरोपीचे नातेवाईक मोहिनी यांच्या घराजवळ राहत असल्यामुळे आपली पत्नी मोहिनीयांच्या घरी असल्याचा त्याला संशय आला. आरोपी मोहिनी यांच्या घरी आला. ‘माझे पत्नीसोबत भांडण झाले, ती घरून निघून गेली आहे, ती कुठे आहे ?’ अशी विचारना केली. मोहिन यांनी ‘माझ्या घरी आली नाही, मला माहिती नाही’ असे सांगितले.
त्यावर आरोपी मोहिनी यांच्या घराच्या वरच्या माळ्यावर गेला आणि घराची पाहणी केली. मोहिनी यांचा मुलगा रोहितने आरोपीला घरात काय पाहत आहे, असे विचारल्याने आरोपीने आपल्याजवळील चाकुने रोहितच्या पोटावर मारून त्यास जखमी केले. मुलाला चाकु मारत असल्याचे पाहून मोहिनी मुलाच्या बचावासाठी धावल्या असता आरोपीने मोहिनी यांच्या उजव्या हाताला चाकु मारून त्यांनाही जखमी केले. जखमी मोहिनी आणि रोहितला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी दिनेशविरुद्ध कलम ३२६, ३२३, ४५२, ५०४, १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.