स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगले; १८ महिन्यांत होणारे काम चार वर्षांनंतरही अर्धवट!
By गणेश हुड | Published: November 19, 2022 01:16 PM2022-11-19T13:16:01+5:302022-11-19T13:25:49+5:30
रस्त्याचे काम २५ टक्के तर पुलांच्या ७५ टक्के कामांना अद्यापही सुरुवात नाही
नागपूर : शहरातील नागरिकांना मोठमोठी स्वप्न दाखवून स्मार्ट सिटी प्रकल्पांचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात विकास तर दूरच आज या प्रकल्पाच्या अर्धवट कामांमुळे प्रकल्प परिसरातील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. १८ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचे अपेक्षित असताना चार वर्षे झाली तरी या प्रकल्पांची कामे अर्धवट आहेत.
पूर्व नागपुरातील १७३० एकर परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प उभारला जात आहे. ६५ कोटींचा हा प्रकल्प आहे. प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावा, यासाठी शापूरजी पालनजी कंपनीला काम देण्यात आले होते. मात्र, या कंपनीने काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असताना ४९ महिन्यांनंतरही एक तृतीयांश काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने या परिसरातील नागरिकांना खाचखळग्यातून धक्के' खावे लागत आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी प्रस्तावित घरकुलांचा प्रकल्पही रखडला आहे.
४९.७६ कि.मी. रस्त्यांपैकी फक्त १२.३६ कि.मी. रस्त्यांचे काम झाले आहे. तर २८ पुलांपैकी १० पुलांचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटीचा मोबदला व चुकीच्या आराखड्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. पारडी ते कळमना दरम्यान २४ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. यामुळे ३०० घरे तुटणार आहे. काही रस्त्याखालून दूषित पाण्याची लाइन गेली आहे. अशा तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.
स्मार्ट सिटीतील प्रस्तावित विकास
पारडी, भरतवाडा, पुनापूर व भांडेवाडी भागाचा विकास, ५२ किलोमीटरचे रस्ते, इंटिग्रेटेड रोड, पाणीपुरवठा, सिवरेज, पावसाळी नाल्या, चांगल्या दर्जाची परिवहन सेवा, रस्ते विकास, उड्डापूल, स्मार्ट बस शेल्टर, शेअर बाईक, ई-रिक्षा, ऑटोमोटेड एमएलसीपी पारडी, होम स्वीट होम, स्मार्ट सिटी क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र, सार्वजनिक उद्यान, लॅन्ड स्केपिंग, कचरामुक्त शहर, स्मार्ट ट्रैश बीन, ग्रीन लाईट प्रकल्प, नागनदी सौदर्यीकरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सुरक्षा अॅप, कम्युनिटी क्लिनिक, ट्रॅफिक कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टिम, पदपथ विकसित करणे, दहनघाट आदींचा समावेश आहे.
- १० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यादेश जारी करून शापूरजी पालनजी कंपनीला स्मार्ट सिटीतील ६५० कोटींचे काम दिले.
- १८ महिन्यांत कंपनीने ४९.७६ कि.मी. लांबीचे रस्ते, २८ पूल व ४ जलकुंभांचे निर्माण अपेक्षित होते.
- ४९ महिन्यांनंतरही १२.३६ कि.मी. लांबीचे रस्ते, १० पूल व ४ जलकुंभांचे काम अजूनही सुरु आहे. ४ काम अपूर्ण असतानाही कंपनीने ४४८.५८ कोटींच्या मोबदल्याची मागणी केली. परंतु संचालक मंडळाने १५.२५ कोटी मोबदला देण्याला सहमती दर्शविली.
- पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा, भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्राचा प्रकल्पात समावेश आहे.