पाेलिसांच्या अमानुष मारहाणीत फरार आराेपींच्या भावाचा मृत्यू; चौकशीसाठी बोलावले होते ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:42 AM2023-02-20T10:42:06+5:302023-02-20T10:44:26+5:30
कन्हानमधील घटना
कन्हान (नागपूर) : पोलिसांवर तलवार उगारणे व दुकानांची ताेडफाेड प्रकरणात हव्या असलेल्या आराेपींबाबत माहिती घेण्यासाठी पाेलिसांनी त्यांच्या मधल्या भावाला ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली. प्रकृती खालावल्याने त्याला हाॅस्पिटलमध्ये भरती केले आणि उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. १७) मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रविवारी (दि. १९) कुटुंबीयांना देण्यात आला. या घटनेमुळे कन्हान (ता. पारशिवनी) शहरात दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. विशेष म्हणजे, दाेन्ही आराेपी सख्खे भाऊ हाेत.
राहुल पंचम सलामे (३०, रा. शिवाजीनगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. ३ फेब्रुवारी राेजी कन्हान शहरात पाेलिसांवर तलवारी उगारणे, दुकानांची ताेडफाेड करण्याची घटना घडली हाेती. या प्रकरणात १२ आराेपींविरूद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. यात खैलेश पंचम सलामे व शुभम पंचम सलामे या दाेघांचा समावेश असून, दाेघेही राहुलचे सख्खे भाऊ हाेत. दाेघेही फरार असल्याने त्यांच्याबाबत माहिती घेण्यासाठी पाेलिसांनी राहुलला ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले.
मारहाण करण्यात आल्याने ४ फेब्रुवारीला त्याची प्रकृती बिघडली हाेती. त्यामुळे त्याला नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती केले हाेते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला १२ फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर १४ फेब्रुवारीला पुन्हा प्रकृती खराब झाल्याने त्याला मेयाे रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान १७ फेब्रुवारीला रात्री त्याचा मृत्यू झाला. मृतदेह रविवारी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्याने त्यांनी पाेलिस ठाण्यासमाेर ठेवून न्याय मिळण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्यातच स्थानिक राजकीय नेत्यांसह नागरिक पाेलिस ठाण्यासमाेर गाेळा झाल्याने तणाव निर्माण झाला हाेता. दाेषींवर याेग्य कारवाई करण्याची ग्वाही उपविभागीय पाेलिस अधिकारी मुख्तार बागवान व ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी दिल्याने तणाव निवळला.
ठाणेदार विलास काळे यांची डाेकेदुखी वाढली...
३ फेब्रुवारीच्या प्रकरणात ठाणेदार विलास काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. प्रमाेद मकेश्वर यांनी ४ फेब्रुवारी दुपारी कार्यभार स्वीकारला. राहुलची प्रकृती याच दिवशी पहाटे खराब झाली आणि त्याला मेयाे रुग्णालयात भरती केले. त्यामुळे विला काळे यांना या प्रकाराला जबाबदार धरले जाऊ शकते. कन्हान शहर आधीच संवेदनशील आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला हाेता. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी शहरात इतर पाेलिस ठाण्यांमधील १० पाेलिस अधिकारी व ६० कर्मचाऱ्यांची कुमक तातडीने बाेलावण्यात आली हाेती.