प्रत्येक जिल्ह्यात विकासाची ‘बुलेट ट्रेन’ वेगाने धावणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: January 29, 2024 09:55 PM2024-01-29T21:55:48+5:302024-01-29T21:55:59+5:30

विकासाचे विकेंद्रीकरण हाच ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’चा मुख्य उद्देश होता.

The 'bullet train' of development will run fast in every district | प्रत्येक जिल्ह्यात विकासाची ‘बुलेट ट्रेन’ वेगाने धावणार

प्रत्येक जिल्ह्यात विकासाची ‘बुलेट ट्रेन’ वेगाने धावणार

नागपूर : विकासाचे विकेंद्रीकरण हाच ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’चा मुख्य उद्देश होता. त्यात काही प्रमाणात यश आले. पुढील वर्षी प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र दालन उभारून तेथील उद्योगांना स्थान देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्यावतीने (एड) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित तीन दिवसीय खासदार औद्योगिक महोत्सव ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ या विदर्भातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीयल एक्स्पो, बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचा सोमवारी थाटात समारोप झाला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, खा. रामदास तडस, खा. कृपाल तुमाने, आ. मोहन मते, अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, मेट्रो सीएमडी श्रावण हर्डीकर, अर्थतज्ज्ञ आनंद राठी, गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल, उद्योगपती सुरेश शर्मा यांच्यासह एडचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न

नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, येथील उद्योगाचा विकास व्हावा, त्यातून रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजक, मंत्री, विविध संस्थाचे अध्यक्ष व गंतवणूकदार यांनी या महोत्सवाला प्रतिसाद दिल्याबद्दल गडकरी यांनी सर्वांचे आभार मानले. 

महोत्सवासाठी एडचे अध्यक्ष आशिष काळे, उपाध्यक्ष प्रणव शर्मा आणि गिरधारी मंत्री, सचिव डॉ. विजय शर्मा, कोषाध्यक्ष राजेश बागडी व सदस्य राजेश रोकडे, निखिल गडकरी, डॉ. महेंद्र क्षीरसागर, प्रदीप माहेश्वरी, प्रशांत उगेमुगे, रवींद्र बोरटकर यांचे सहकार्य लाभले. आशीष काळे म्हणाले, महोत्सवात यशस्वी स्टार्टअप, २५० हून अधिक स्टॉल आणि सर्व आकाराच्या इंडस्टीचा सहभाग राहिला. अनेक सामंजस्य करार झाले. नितीन गडकरींचे व्हिजन आणि आमच्या प्रयत्नांचे हे यश आहे. संचालन रेणुका देशकर यांनी तर राजेश रोकडे यांनी आभार मानले.

रामचरण ग्रुप व सियानमध्ये सामंजस्य करार

समारोपीय सत्रात रामचरण ग्रुप ऑफ चेन्नई आणि सियान नागपूर यांच्यात ‘टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर सीओटू’ संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. रामचरण ग्रुपचे कौशिक पलिचा व सियान अ‍ॅग्रोचे निखिल गडकरी व सारंग गडकरी यांनी करारावर स्वाक्षरी केली.

‘व्हिजनरीज ऑफ विदर्भ’चे प्रकाशन

‘व्हिजनरीज ऑफ विदर्भ’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन समारोपीय कार्यक्रमात करण्यात आले. बुकमध्ये विदर्भातील ३५ आघाडीचे उद्योजक, व्यावसायिक आणि पाच स्टार्टअप्सच्या यशोगाथा आहेत. यात नागपुरातील विको, सोलर इंडस्ट्रीज, हल्दीराम, बैद्यनाथ, इन्फोसेप्ट यासह ग्रामहित, टीसेकंड सारख्या स्टार्टअप्सचाही समावेश आहे. सर्वच उद्योजकांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कॉफी टेबल बुकची माहिती डॉ. विजय शर्मा यांनी दिली.

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ रोजगार निर्मितीचे व्यासपीठ ठरेल : देवेंद्र फडणवीस

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ मध्ये चांगल्या चर्चा झाल्या. उत्पादने प्रदर्शित झाली. सुंदर स्टार्टअप बघायला मिळाले. अनेक सामंजस्य करार झाले. पहिल्याच वर्षी झालेल्या यशस्वी आयोजनामुळे भविष्यात ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ रोजगार निर्मितीचे मोठे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी व्यक्त केला.

विदर्भाची उद्योगातील ताकद कळली : गिरीश महाजन

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मुळे विदर्भातील उद्योगांची ताकद कळल्याचे मत पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पर्यटनदृष्ट्या मागासलेला आहे. सर्वसमावेश पर्यटन धोरण आखल्यास देशविदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील आणि रोजगार निर्माण होईल व पर्यटन व्यवसायाला बळकटी मिळेन.

Web Title: The 'bullet train' of development will run fast in every district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.