गांधीबागेत ‘बबली गॅंग’! व्यापारी लघुशंकेला गेला, बॅगेतून पाच जणींनी पळवले पाच लाख!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 12:09 PM2023-10-05T12:09:27+5:302023-10-05T12:10:15+5:30

भांडेविक्रेत्याच्या काऊंटरवरून उडविली रोकड : सीसीटीव्हीत घटना कैद

The businessman went to Laghushanka, five people stole five lakhs from the bag! | गांधीबागेत ‘बबली गॅंग’! व्यापारी लघुशंकेला गेला, बॅगेतून पाच जणींनी पळवले पाच लाख!

गांधीबागेत ‘बबली गॅंग’! व्यापारी लघुशंकेला गेला, बॅगेतून पाच जणींनी पळवले पाच लाख!

googlenewsNext

नागपूर : इतवारीच्या गांधीबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर होलसेल मालाची दुकाने असून परिसरात अनेकदा चोरीच्या घटना घडतात. मात्र आता काही महिलादेखील चोरीसाठी सक्रिय झाल्या आहेत. पाच महिलांच्या टोळीने एका होलसेल भांडेविक्रेत्याच्या काऊंटरवरून साडेचार लाख रुपयांची रोकड उडविली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

भुपेंद्र वासवानी (४५) यांचे गांधीबागेत समाधान सेल्स नावाचे होलसेल भांड्यांचे दुकान आहे. २९ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतील एका व्यापाऱ्याकडून साडेचार लाख रुपये रोख रक्कम घ्यायची होती. संबंधित व्यापारी दुपारच्या सुमारास त्यांच्या दुकानात आला व त्याने त्यांच्या काऊंटरवर पैशांची बॅग ठेवली. तो लघुशंकेसाठी गेला. त्याचवेळी दुकानात पाच महिला भांडे घेण्यासाठी आल्या. त्यामुळे वासवानी यांनी त्यांना भांडी दाखविण्यास सुरुवात केली व त्यांचे बॅगेकडे दुर्लक्ष झाले. संबंधित व्यापारी लघुशंका करून परत आल्यावर त्याने काऊंटरवरून बॅग उचलली व पैसे देण्यासाठी चेन उघडली. मात्र त्यात पैसे नव्हते. हे पाहून दोघांनाही धक्का बसला.

वासवानी यांनी सीसीटीव्ही तपासले असता पाच महिलांपैकी एका महिलेने बॅगेतून पैसे लांबविल्याची बाब समोर आली. चार महिलांनी वासवानी यांना बोलण्यात गुंतविले व त्यांचे दुर्लक्ष असल्याचा फायदा घेत पाचव्या महिलेने पैसे उडविले. त्यांनी परिसरात महिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला कुठेही दिसल्या नाहीत. वासवानी यांची या घटनेनंतर प्रकृतीच बिघडली. त्यांनी प्रकृती सावरल्यानंतर अखेर तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पाचही अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: The businessman went to Laghushanka, five people stole five lakhs from the bag!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.