टायर फुटल्याने कार उलटली; आईचा मृत्यू; मुलगा, सून जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 09:23 PM2023-05-29T21:23:20+5:302023-05-29T21:24:13+5:30
Nagpur News लग्नसमारंभ आटाेपून परत येत असलेल्या कारचा मागचा डावा टायर फुटला आणि वेगात असलेली कार अनियंत्रित हाेऊन राेडवर उलटली. यात वृद्ध आईचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा आणि सून दाेघे गंभीर जखमी झाले.
नागपूर : लग्नसमारंभ आटाेपून परत येत असलेल्या कारचा मागचा डावा टायर फुटला आणि वेगात असलेली कार अनियंत्रित हाेऊन राेडवर उलटली. यात वृद्ध आईचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा आणि सून दाेघे गंभीर जखमी झाले. कार चालक मात्र थाेडक्यात बचावला. ही घटना चिमूर-उमरेड राेडवरील उमरी फाटा परिसरात साेमवारी (दि. २९) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
सत्यभामा बाळकृष्ण झिलपे (७५) असे मृत आईचे नाव असून, गंभीर जखमींमध्ये मुलगा भोजराज बाळकृष्ण झिलपे (५२) व सून सुनीता भोजराज झिलपे (४८) या दाेघांचा समावेश आहे. हे तिघेही कुही शहरातील रहिवासी आहेत. ते पिंपळनेरी, ता.चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील राजूरकर परिवारातील लग्नसमारंभात सहभागी हाेण्यासाठी चिमूरला गेले हाेते. लग्न आटाेपल्यानंतर तिघेही एमएच-४०/सीएच-३४४६ क्रमांकाच्या कारने चिमूरहून उमरेडे मार्गे कुहीला यायला निघाले.
ते पिंपळनेरी नजीकच्या उमरी फाटा परिसरात येताच, त्यांच्या कारचा डाव्या भागाचा मागचा टायर फुटला आणि वेगात असलेली कार अनियंत्रित झाली. या कारने राेडवर दाेन काेलांट्या घेतल्याने, कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यातच काही वेळातच सत्यभामा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच, चिमूर पाेलिसांनी घटनास्थळ गाठून सत्यभामा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी, तर भाेजराज व सुनीता यांना उपचारासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. कार चालकाला मात्र फारशी दुखापत झाली नाही. या प्रकरणी चिमूर पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास पोलिस निरीक्षक मनोज गभणे करीत आहेत.