Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली, दिशा मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 05:26 AM2022-12-23T05:26:39+5:302022-12-23T05:28:48+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

the case of Disha salian death will be investigated by SIT devendra fadnavis in maharashtra winter session 2022 jayant patil Suspension | Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली, दिशा मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार 

Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाची ‘दिशा’ भरकटली, दिशा मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार 

googlenewsNext

नागपूर : सुशांत सिंहची सेक्रेटरी दिशा सालीयनच्या संशयास्पद मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी केली. याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांनी अभूतपूर्व गोंधळ झाला. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांचे निलंबन झाले. यामुळे अधिवेशनाची दिशाच बदलली.

अधिवेशनाला चार दिवस झाले तरी मागासलेले विदर्भ-मराठवाडा आणि राज्यासमोरील प्रश्नांंवर चर्चा आणि निर्णयांची प्रतीक्षाच आहे. सीबीआयने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास केला आहे. दिशा सालीयन मृत्यूचा सीबीआयने तपास केला नसल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. दिशा मृत्यूची चौकशी करावी, ही मागणी करत सत्ताधारी आमदारांनी प्रचंड गदारोळ घातला. 

मुख्यमंत्री झाले संतप्त
जयंत पाटील यांनी अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरले तेव्हा सभागृहात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय संतप्त झाले. अध्यक्षांच्या दालनात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. पाटील माफी मागतील, आता विषय संपवा असे विरोधकांनी म्हटले; पण मुख्यमंत्री ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नव्हती. म्हणूनच मी ‘असा निर्लज्जपणा करू नका’ असे सरकारला उद्देशून म्हणालो. 
जयंत पाटील

अध्यक्षांबद्दल अपशब्द, जयंत पाटील निलंबित 

  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने त्यांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. तोवर त्यांना नागपूर आणि मुंबईतील विधानभवन परिसरात येण्यासही मनाई असेल.
  • दिशा मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार हे बोलत असतानाच शिवसेनेचे भास्कर जाधवही बोलू इच्छित होते. उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे, असे म्हणत अध्यक्ष नार्वेकर यांनी पुढचे कामकाज पुकारले. 
  • त्याचवेळी जयंत पाटील उभे राहिले आणि त्यांनी अध्यक्षांबाबत अपशब्द वापरला. अत्यावर सत्तारुढ सदस्य अत्यंत आक्रमक झाले. कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. 


खासदाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा
मुंबईच्या चेंबूर परिसरातील खासदाराविरोधात पोलिसात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल झाल्याचा मुद्दा परिषदेत गाजला. याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित खासदाराची एसआयटी चौकशीचे व अधिवेशन संपण्यापूर्वी घोषणा करण्याचे निर्देश दिले. 

दिशा प्रकरणाची चौकशी करत असाल मग पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातही चौकशी करावी.
अजित पवार

Web Title: the case of Disha salian death will be investigated by SIT devendra fadnavis in maharashtra winter session 2022 jayant patil Suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.