वेशीबाहेरची स्मशानभूमी घराशेजारी आली; आरोग्यावर दुष्परिणाम होतो का डॉक्टर?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:58 PM2023-05-22T12:58:32+5:302023-05-22T12:59:25+5:30
पावसाळ्यात हिवाळ्यात दुर्गंधी : आता भीती वाटत नाही
नागपूर : ३० ते ३५ वर्षांपूर्वी शहरात बोटावर मोजण्याइतकेच घाट होते. मोक्षधाम, गंगाबाई, अंबाझरी, वैशालीनगर अशा चार ते पाच मोजक्या स्मशानभूमी होत्या. येथे पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून अंत्ययात्रा यायच्या. परंतु गेल्या ३० ते ३५ वर्षांत शहराचा झपाट्याने विस्तार झाला. जसजसे शहर वाढले तसतसे मानेवाडा, शांतिनगर, दिघोरी, पारडी, वाठोडा, कळमना, फ्रेंडस कॉलनी, मानकापूर, सहकारनगर या स्मशानभूमी तयार झाल्या. पण आता या स्मशानभूमीदेखील घराशेजारी आल्या आहेत. शहराच्या बाहेर असलेल्या या स्मशानभूमी वाढत्या शहरीकरणामुळे भर वस्तीत आल्या आहेत. स्मशानभूमीच्या शेजारी वर्षानुवर्षे नागरिक राहत असून, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दुर्गंधी सोडल्यास आरोग्यावर फारसा परिणाम जाणवत नसल्याच्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया आहे.
- शहरात १९ स्मशानभूमी
नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाखांवर पोहोचली आहे. शहराच्या विस्तारीकरणामुळे महापालिकेचेही दहा झोन झाले आहे. प्रत्येक झोनमध्ये स्मशानभूमी आहेत; पण काही झोनमध्ये १, तर काही झोनमध्ये चार स्मशानभूमी आहेत.
- सर्वच स्मशानभूमींच्या शेजारी वस्ती
शहरात १९ दहनघाटाला लागून वस्त्या आहेत. पूर्वी काही घाट वेशीबाहेर होते. पण आता घाटाच्या पलीकडेही वस्त्या झाल्याने नवीन घाट महापालिका प्रशासन विकसित करणार आहे.
- २० वर्षांपूर्वी गावाबाहेर होती ही ठिकाणे
मानेवाडा, दिघोरी, नरसाळा, वाठोडा, नारी, कळमना, पुनापूर, भरतवाडा, जयताळा, गोरेवाडा, खसाळा, मसाळा.
दहा ते बारा वर्षांपासून आमचे घर घाटापासून काही अंतरावर आहे, पण घाटामुळे आरोग्यावर त्याचा काही परिणाम झाला असे जाणवले नाही. पावसाळ्यात, हिवाळ्यात दुर्गंधी सुटते. तेही आता जाणवत नाही.
पराग विंचुर्णे, रहिवासी, मानेवाडा
आम्ही गंगाबाई घाटाला जेव्हा सुरक्षा भिंत नव्हती, तेव्हापासून राहत आहोत. पूर्वी प्रेत जळताना दिसत होती. राखीचे धुराळे उडत होते. आता घाटाला सुरक्षा भिंत केली आहे. प्रदूषण होवू नये म्हणून शेड व इतर उपाययोजना केली आहे. जेव्हा घाटावरील राखेचे धुराळे उडत होते तेव्हाही आणि आताही आरोग्यावर परिणाम झाला असे जाणवले नाही. तेव्हा थोडी भीती वाटायची, आता तीदेखील राहिली नाही. उलट आता घाटाच्या आतमध्ये असलेल्या उद्यानात रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत आम्ही वॉकिंग करीत असतो.
विठोबा तुर्केल, रहिवासी, गंगाबाई घाट परिसर
- धुरामुळे ‘सीओपीडी’ आजाराचा धोका
वायूप्रदूषणाचे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतात. यात श्वसननलिकेचे विकार, कफ वाढणे, शिंका येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ब्रॉन्कायटिस, अस्थमाचा धोका वाढतो. धुराच्या सतत संपर्कात राहिल्यास ‘सीओपीडी’ आजाराचा धोका वाढतो. दम्याचा रुग्णांच्या लक्षणात वाढ होते.
- डॉ. आकाश बलकी, फुप्फुस रोगतज्ज्ञ