पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान

By योगेश पांडे | Published: November 15, 2024 05:50 AM2024-11-15T05:50:06+5:302024-11-15T05:52:16+5:30

खोपडे-पेठे लढतीत पांडे, हजारेंच्या उमेदवारीच्या तिरंगी-चौरंगी छटा.

The challenge of the rebels in front of Mahayuti Mahavikas alliance in East Nagpur | पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान

पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मागील तीन निवडणुकींपासून भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या पूर्व नागपुरात यंदा पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत. एकीकडे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे विजयाचा चौकार लावण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे तळागाळात प्रचारावर भर देत आहेत. मात्र या दोन्ही प्रमुख उमेदवारांसमोर महायुतीमहाविकास आघाडीतील बंडखोरांचे आव्हान आहे. बंडखोरांच्या मतांच्या आधारेच येथील निकालाचे समीकरण ठरेल, असे चित्र आहे.

कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघाला खोपडे यांनी २००९ साली सुरुंग लावला व त्यानंतर त्यांनी येथून हॅट्ट्रिक लगावली. यावेळी भाजपमधून नवीन चेहरा देण्यात यावा, अशी अनेकांची मागणी होती. मात्र पक्षाने खोपडे यांनाच परत संधी दिली. दुसरीकडे हा मतदारसंघ कॉंग्रेसला मिळावा यासाठी खूप प्रयत्न झाले. मात्र अखेरच्या क्षणी येथून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांना तिकीट मिळाले. यामुळे नाराज झालेले गेल्यावेळचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी करीत अपक्ष आव्हान दिले, तर अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी खोपडे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली. त्यांनी प्रचाराचे रान पेटविले आहे.

या मतदारसंघातून १७ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक पट्ट्यांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. पुरुषोत्तम हजारे यांचा या मतदारसंघात चांगला ‘कनेक्ट’ आहे. कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्तेदेखील त्यांच्या संपर्कात आहेत, तर दुसरीकडे आभा पांडे मागील महिन्याभरापासून प्रचाराला लागल्या असून, त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. खोपडे यांच्याविरोधात अनेक ठिकाणी ॲंटी इन्कबन्सी असल्याचा दावा इतर उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

२०१४ व २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वांत जास्त मताधिक्य पूर्व नागपुरातून मिळाले. २०२४ मध्येदेखील गडकरी यांना येथूनच सर्वात जास्त ७३ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता कृष्णा खोपडे यांच्यासमोर तो प्रभाव टिकविण्याचे आव्हान आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्प प्रचाराच्या केंद्रस्थानी
पूर्व मतदारसंघात विविध आर्थिक स्तराचे मतदार असून, जातीय समीकरणांमध्येही वैविध्य आहे. स्मार्ट सिटीचा मतदारसंघ अशी ओळख असली तरी पूर्व नागपुरात मूलभूत समस्या कायम आहेत. विरोधकांकडून या मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प, असुविधांची बजबजपुरी, वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी, स्मार्टसिटीच्या आड स्थानिकांची पिळवणूक, तेथील भूमाफिया, खंडणीचे प्रकार इत्यादी मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे. खोपडे यांच्या प्रचाराचा भर मतदारसंघातील विकासकामे व विविध योजनांचा झोपडपट्टीतील लोकांना दिलेला लाभ यावर आहे.

मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार?
या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी व बसपानेदेखील उमेदवार दिले आहेत. बसपाला लोकसभेत फारशी कमाल दाखविता आलेली नसली तरी अनेक वस्त्यांमध्ये कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. पांडे, हजारे यांच्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील मतांचे काही प्रमाणात विभाजन निश्चितपणे होण्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.

विधानसभा २०१९
कृष्णा खोपडे : भाजप (विजयी) : १,०३,९९२
पुरुषोत्तम हजारे : कॉंग्रेस : ७९,९७५
सागर लोखंडे : बसप : ५,२८४
मंगलमुर्ती सोनकुसरे : वंचित बहुजन आघाडी : ४,३३८
नोटा : ३,४६०

विधानसभा २०१४
कृष्णा खोपडे : भाजप (विजयी) : ९९,१३६
अभिजित वंजारी : कॉंग्रेस : ५०,५२२
दिलीप रंगारी : बसप : १२,१६४
दुनेश्वर पेठे : राष्ट्रवादी : ८,०६१
अजय दलाल : शिवसेना : ७,४८१

लोकसभेतील मते (२०२४)
नितीन गडकरी : महायुती : १,४१,३१३
विकास ठाकरे : महाविकास आघाडी : ६७,९४२
योगेश लांजेवार : बसप : २,९७८

एकूण उमेदवार : १७
एकूण मतदार : ४,१८,९८१
पुरुष मतदार : २,१०,५६२
महिला मतदार : २,०८,३८६
तृतीयपंथी : ३२

Web Title: The challenge of the rebels in front of Mahayuti Mahavikas alliance in East Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.