महायुती समोर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे मन करावे
By योगेश पांडे | Published: October 16, 2024 01:49 PM2024-10-16T13:49:42+5:302024-10-16T13:50:47+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष : भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने दोन गोष्टी अधिक मिळाव्यात
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून त्यांचा आवाका वाढला आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्या पक्षाने जास्त जागा लढाव्या असे त्यांना वाटणे सहाजिकच आहे. परंतु आम्हालादेखील पक्ष सांभाळावा लागतो. संख्याबळ लक्षात घेता आम्हाला दोन गोष्टी जास्त मिळायला हव्या अशी आमची नेहमीच मागणी असते. महायुती समोर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठे मन करावे, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. नागपुरात बुधवारी ते प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते.
मागील निवडणूकीत उद्धव ठाकरेंनी शब्द फिरविला. मात्र शिंदे, अजित पवार हे मोठे मन करत आमच्यासोबत आले. कोणत्या पक्षाचा त्याग मोठा हे ठरवता येणार नाही. उगाच ताणतणाव करून निवडणूकीत पराभव पत्करणे हे कुणालाही परवडणार नाही. संख्या वाढविण्यासाठी कुणीही मतदारसंघ घेऊ नये, असे बावनकुळे म्हणाले.
एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या पक्षाकडे जे मतदारसंघ आहेत तेथील जागांबाबत कुठलीही चर्चा भाजपने केलेली नाही. मात्र उर्वरित मतदारसंघात तीनही पक्ष चाचपणी करत आहेत. जो जिंकू शकेल त्यालाच ती जागा जाईल अशी सर्वांचीच भूमिका आहे. दोन तीन मतदारसंघात आमचे व राष्ट्रवादीचे उमेदवार तुल्यबळ आहेत. अशा ठिकाणी सारासार विचार करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.