किटलीचे झाकण हरवल्याने बालकाने रचले अपहरणाचे नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 10:16 PM2022-09-24T22:16:32+5:302022-09-24T22:17:02+5:30
Nagpur News किटलीचे झाकण हरवल्यामुळे कुटुंबीयांच्या भीतीने एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपल्याच अपहरणाचे नाट्य रचून कुटुंबीय आणि पोलिसांची दिशाभूल केली.
नागपूर : किटलीचे झाकण हरवल्यामुळे कुटुंबीयांच्या भीतीने एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपल्याच अपहरणाचे नाट्य रचून कुटुंबीय आणि पोलिसांची दिशाभूल केली, परंतु पोलिसांनी या बालकाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, त्याने अपहरणाची घटना सपशेल खोटी असल्याची कबुली दिली आहे.
गिट्टीखदान ठाण्यांतर्गत पेंशननगर परिसरातील एका १४ वर्षीय बालकाने बुधवारी पांढऱ्या व्हॅनमधून आलेल्या अज्ञात आरोपींनी आपल्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची कहानी कुटुंबीय आणि पोलिसांना सांगितल्यामुळे खळबळ उडाली होती. या बालकाचे बयाण एका स्थानिक न्यूज पोर्टलने प्रसारित केल्यामुळे ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. पोलीस यंत्रणाही या घटनेमुळे खळबळून जागी झाली, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी संयम ठेऊन या बालकाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले.
झाले असे की, हा मुलगा किटलीत दूध घेऊन दूध ग्राहकाला देण्यासाठी गेला होता, परंतु त्याच्या किटलीचे झाकण कुठेतरी पडले. किटलीचे झाकण हरवल्यामुळे हा मुलगा घाबरला. कुटुंबीयांच्या भीतीमुळे त्याने आपले अपहरण झाल्याची खोटी कहाणी सांगितली. त्याच्या बयाणानुसार पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली, परंतु पोलिसांना तपासात कुठेही अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना आढळली नाही. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी या बालकाला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, कुटुंबीयांच्या भीतीमुळे आपण अपहरणाची खोटी कहाणी सांगितल्याची कबुली दिली. गिट्टीखदानचे निरीक्षक बापू ढेरे यांनीही अपहरणाची कहाणी खोटी असल्याची पुष्टी केली आहे.
..........