ती मुले किंचाळत राहिली, कुणाच्याच कानापर्यंत मरणाची हाकच पोहोचली नाही
By योगेश पांडे | Published: January 19, 2024 05:34 AM2024-01-19T05:34:34+5:302024-01-19T05:34:55+5:30
अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या कुटुंबावर मोठा आघात : मुलांच्या जिवलग कुत्र्याने अखेरपर्यंत दिली साथ
नागपूर : म्हणायला ते शहरातील कच्चे घर होते, मात्र तेथे ना लाईट होते, ना पाणी आणि ना कुठला हक्काचा शेजार. मुलांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी आई राबायची आणि मुले एकमेकांना सांभाळत दिवस काढत होते. गुरुवारी त्यांच्या त्या घरात आग लागली, मात्र काही मीटर अंतरावर असलेल्या फ्लॅट्सपर्यंत ना मुलांच्या किंकाळ्या पोहोचल्या, ना आगीचे कुठले संकेत मिळाले. घराच्या पाठीमागे असलेल्या मुख्य रस्त्यावरील एका व्यक्तीला आगीचे लोळ दिसल्यावर ही जीवघेणी आग उघडकीस आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दोन लहान मुलांच्या किंकाळ्या कधीच दाहक आगीत जळून भस्म झाल्या होत्या. दुर्दैवाची बाब म्हणजे दोन सख्ख्या भावांसोबत त्यांच्यासोबत राहणारे कुत्र्याचे पिल्लूदेखील मरण पावले.
दिपाली उईके कोरोनाच्या काही काळ अगोदरपासून गौरखेडे कॉम्प्लेक्सच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत रहायला आल्या होत्या. विटांचे कच्चे घर उभारले होते व वर तात्पुरते छप्पर होते. तेथे वीजपुरवठा, बाथरूम किंवा इतर कुठलीही सुविधा नव्हती. शेजाऱ्यांशी जास्त संपर्क नव्हता आणि शेजाऱ्यांना तिचा पतीदेखील दिसला नव्हता. गुरुवारी ती बाहेर गेली आणि आगीच्या रुपाने काळाने तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा घास घेतला.
घराचा कोळसा, आईच्या स्वप्नांची राख
दिपालीने मुलांच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहिली होती. मात्र आगीने तिच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. या घटनेनंतर ती मोठ्या धक्क्यात होती. एक परिचित कुटुंब तिला घरी घेऊन गेले होते. दुसरीकडे घराचा पूर्ण कोळसा झाला होता. घरातील काळी पडलेली भांडी, माठ आणि मुलांचे वाचलेले कपडे पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी येत होते.
देवू, प्रभास खेळून घरी आले अन घात झाला
आई देवांशला प्रेमाने देवू म्हणत होती व त्याचा प्रभासवर फारच जीव होता. दोघेही त्यांच्या घराजवळच्या एका डेली नीड्सच्या दुकानासमोर बराच वेळ खेळायचे. परिसरातील नागरिकदेखील त्यांच्या बाललीला पहायचे. अगदी गुरुवारी सायंकाळीदेखील ते परिसरात खेळताना दिसून आले. मात्र त्यांचे घर काहीसे कोपऱ्यात असल्याने कुणालाच आगीचा प्रकार लक्षात आला नाही. त्यांच्या शेजारी राहणारेदेखील एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते.
सिलिंडरचा स्फोट झाला असता तर...
त्या घरात एक सिलिंडरदेखील होता. सुदैवाने आगीत त्याचा स्फोट झाला नाही. अन्यथा गौरखेडे कॉम्प्लेक्समधील काही इमारतींना निश्चितच त्याचा फटका बसला असता.