रागाच्या भरात मुलांनी घर सोडले, आरपीएफने कुटुंबियांत पोहचवले; ८५८ कुटुंबांना दिलासा
By नरेश डोंगरे | Published: December 22, 2023 02:19 PM2023-12-22T14:19:40+5:302023-12-22T14:19:55+5:30
अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात.
नरेश डोंगरे
नागपूर : कुणी आमिष दाखवले म्हणून तर कुणी रागावले म्हणून स्वत:चे घर सोडले. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना हेरले आणि त्यांच्या पालकांना बोलवून सुखरूपपणे त्यांच्या स्वाधिन केले. होय, गेल्या आठ महिन्यात आरपीएफने एकूण ८५८ मुला-मुलींना परत त्यांच्या कुटुंबात पाठविले आहे.
अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात. यातील काही जण भांडणामुळे, काही स्वप्नातील दुनिया बघण्यासाठी तर काही जण कुणी आमिष दाखविल्यामुळे स्वत:चे घर सोडून पळून जातात. आपल्या गावापासून दूर मुंबई, दिल्ली सारख्या महानगरात पळून जाण्याकडे या मुलांचा कल असतो. खिशात पैसे असो नसो, ही मंडळी घरून रेल्वे स्थानकावर पळून येतात.
मोठ्या महानगराकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत बसून ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा मुलांवर आरपीएफची खास नजर असते. त्यांच्या हालचाली, संशयास्पद वर्तनावरून ते त्यांना ताव्यात घेतात. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत या मुलांची आरपीएफ आस्थेने विचारपूस करतात आणि ते घरून पळून आल्याचे लक्षात येताच त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचे समुपदेशन करतात आणि नंतर या मुलांना पालकांच्या स्वाधिन केले जाते. यंदा महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकावर अशा प्रकारे ८५८ मुले आरपीएफने पकडली आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले. यात नागपूर विभागातील १११ मुला-मुलीमचा समावेश आहे.