‘प्रिन्स’ची चतुराई; रेल्वेत लपवलेल्या मद्यसाठ्याचा लावला छडा
By नरेश डोंगरे | Published: May 8, 2024 12:00 AM2024-05-08T00:00:01+5:302024-05-08T00:00:11+5:30
हमसफर एक्स्प्रेसमधून मद्यसाठा जप्त : आरपीएफची कारवाई; तस्करांची नावे अंधारात
नागपूर : तिरूपती एक्स्प्रेसमधून होत असलेल्या मद्य तस्करीचा छडा लावून प्रिन्सनामक श्वानाने मोठा मद्यसाठा पकडून दिला. विशेष म्हणजे, या कारवाईला बरेच तास होऊनही रेल्वे सुरक्षा दलाकडून मद्य तस्करांची नावे उघड करण्याची तसदी घेतली गेली नाही.
वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमधून अनेक दिवसांपासून मद्य आणि गांजाची तस्करी बिनधास्तपणे केली जाते. अधून-मधून रेल्वे पोलिस (जीआरपी) किंवा रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)कडून त्याचा छडाही लावला जातो. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे तिरूपती हमसफर एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर आली असताना आरपीएफचे जवान प्रिन्सनामक श्वानासह या गाडीची तपासणी करू लागले. कोच नंबर बी-४ मध्ये १५, ४५ आणि ५२ नंबरच्या सीटखाली तीन संशयास्पद पिशव्या आढळल्या. प्रिन्सने या पिशव्याजवळ जाऊन आरपीएफच्या जवानांना संकेत दिले. त्यामुळे त्या पिशव्या तपासण्यात आल्या. त्यात इंग्लिश मद्याच्या वेगवेगळ्या ३८ बाटल्या आढळल्या. या मद्याची किंमत ८८ हजार ५०० रुपये आहे. आरपीएफने हा मद्यसाठा जप्त करून पुढील कारवाईसाठी तो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपुर्द केला. विशेष म्हणजे, आरपीएफने आज या कारवाईचे प्रसिद्धीपत्रक दिले. मात्र, मद्य तस्करी करणारे कोण, त्यांची नावे उघड करण्याचे टाळले. त्या संंबंधाने माहिती देण्याची तसदी अधिकाऱ्यांनी घेतली नाही.