आता पारा घसरला, वाढली थंडी; पुढचे काही दिवस साैम्य थंडीचा अंदाज
By निशांत वानखेडे | Updated: January 1, 2025 20:05 IST2025-01-01T20:04:59+5:302025-01-01T20:05:16+5:30
डिसेंबर महिन्यात नागपूरकरांनी १० ते १९ तारखेपर्यंत केवळ १० दिवस थंडीचा अनुभव घेतला.

आता पारा घसरला, वाढली थंडी; पुढचे काही दिवस साैम्य थंडीचा अंदाज
निशांत वानखेडे, नागपूर : गेले दहा-बारा दिवस सरासरीपेक्षा माेठ्या फरकाने वाढलेले किमान तापमान आता घसरायला लागले आहे. बुधवारी नागपूरच्या किमान तापमानात २.१ अंशाची घसरण हाेत पारा १४.३ अंशावर खाली आला. अद्याप तापमान सरासरीपेक्षा वर असले तरी वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे.
डिसेंबरच्या १९ तारखेपासून वढलेला पारा पुन्हा खाली उतरला नाही. १९ डिसेंबरच्या रात्री पारा ९.२ अंशावर हाेता आणि २४ तासात ढगाळ वातावरणामुळे ताे ६.९ अंशाने चढला व १६.१ अंशाची नाेंद झाली. २२ तारखेला तापमान ११.८ अंशावर आले खरे पण त्यानंतर ढगांची गर्दी आणि पावसाच्या शक्यतेने तापमान वाढत गेले. थर्टी फर्स्टच्या रात्री तापमान १६.४ अंश नाेंदविण्यात आले. १ जानेवारीला त्यात २.१ अंशाची घसरण हाेत १४.३ अंशाची नाेंद झाली. डिसेंबर महिन्यात नागपूरकरांनी १० ते १९ तारखेपर्यंत केवळ १० दिवस थंडीचा अनुभव घेतला. या काळात तापमान १० अंशाच्या खाली हाेते. १५ डिसेंबरला सर्वात कमी ७ अंशाची नाेंद झाली हाेती.
सध्या जम्मू काश्मीर ते उत्तर भारतापर्यंत कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र वाऱ्याची दिशा विपरित असल्याने त्याचा प्रभाव विदर्भावर पडण्याची शक्यता सध्या दिसून येत नाही. मात्र पुढचे पाच दिवस किमान व कमाल तापमान सरासरीच्या आसपास राहिल आणि गारव्याची जाणीव हाेत राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दशकात २०१९ मध्ये सर्वात कमी तापमान
जानेवारी महिन्यातील वातावरण डिसेंबरसारखेच असते व थंडीची जाणीव हाेत राहते. कधीकधी तापमान ४.५ ते ६.५ अंशाच्या दरम्यान जाते व थंडीच्या लाटेचाही सामना करावा लागताे. शतकात ७ जानेवारी १९३७ राेजी नागपूरला सर्वात कमी ३.९ अंश तापमानाची नाेंद झाली हाेती. गेल्या दशकभरात २०१९ च्या ३० जानेवारीला सर्वात कमी ४.६ अंश तापमानाची नाेंद झाली हाेती.
दशकातील थंडीची स्थिती व तापमान (अंशात)
वर्ष किमान तापमान
२०१५ ५.३
२०१६ ५.१
२०१७ ७.२
२०१८ ८
२०१९ ४.६
२०२० ५.७
२०२१ १०.३
२०२२ ७.६
२०२३ ८
२०२४ ८.७