डिसेंबरमधील थंडी नागपूरकरांना गारठून सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 08:56 PM2022-12-01T20:56:58+5:302022-12-01T20:58:21+5:30
Nagpur News सध्या गारठा अन् हुडहुडी भरविणारी थंडी सोसणाऱ्या नागपूरकरांना डिसेंबर महिना मात्र चांगलाच गारठून सोडणार आहे.
नागपूर : सध्या गारठा अन् हुडहुडी भरविणारी थंडी सोसणाऱ्या नागपूरकरांना डिसेंबर महिना मात्र चांगलाच गारठून सोडणार आहे. नागपूरचे आकाश गुरुवारी काहीसे ढगांनी आच्छादले हाेते. त्यामुळे रात्रीच्या तापमानात अंशता वाढ नाेंदविण्यात आली. पारा चढला तरी हवेतील गारवा मात्र कायम हाेता. सामान्यत: डिसेंबर महिन्यात रात्रीचा पारा घसरण्याचे सत्र सुरू हाेते व कडाक्याची थंडी वाढते. यावेळी मात्र थंडीला अधिक जाेर राहण्याची स्थिती असून दाेनदा थंडीची लाट सहन करावी लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
डिसेंबरमध्ये सामान्यता दिवसाचे कमाल तापमान सरासरी २८.९ अंशाच्या आसपास आणि रात्रीचे किमान तापमान सरासरी १२.९ अंशावर असते. साल २००० च्या २ डिसेंबर राेजी कमाल तापमान ३९.७ अंशावर गेले हाेते. गेल्या दशकभरात रात्रीचा पारा सातत्याने ८ अंशाच्या खाली घसरले आहे. २९ डिसेंबर २०१८ राेजी पारा ३.५ अंशावर गेला हाेता, जाे आतापर्यंतचा सर्वात कमी आहे. या महिन्यात पावसाचीही शक्यता असते. १९६७ साली या महिन्यात तब्बल १६५.७ मिमी पावसाची नाेंद झाली आहे तर १९६२ साली ५ डिसेंबर राेजी २४ तासात ६१ मिमी पाऊस नाेंदविला गेला हाेता. या काळात उत्तरेचा भाग हिवाळी पावसाने प्रभावित राहत असल्याने थंडे वारे मध्य भारताकडे प्रवाहित हाेत असल्याने थंडीत वाढ हाेते.
गुरुवारी नागपूरचे किमान तापमान १३.६ अंश नाेंदविण्यात आले तर कमाल तापमान २९.६ अंश आहे. ढगाळ वातावरणामुळे दाेन्ही तापमानात अंशता वाढ झाली आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यातही दाेन्ही तापमानात अंशता वाढ झाली आहे. २४ तासात पारा वाढला असला तरी सरासरीपेक्षा ताे कमीच आहे. त्यामुळे दिवसा हलकी व रात्री कडाक्याच्या थंडीची जाणीव हाेत आहे. सध्या आकाश ढगाळ असले तरी पावसाची कुठलीही शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पुढचे दाेन-तीन दिवस वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे.