शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार

By आनंद डेकाटे | Published: June 28, 2024 05:32 PM2024-06-28T17:32:55+5:302024-06-28T17:34:55+5:30

७,२८७ शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांतच प्रलंबित : महाविद्यालयांवर होणार कारवाई

The college is responsible if the student misses the scholarship | शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार

The college is responsible if the student misses the scholarship

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ऑनलाइन अर्ज असूनही नागपूर जिल्ह्यातील ३,१५५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज अद्याप सादर केलेले नाही. तर ७,२८७ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबित ठेवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, या परिस्थिती विद्यार्थी शिष्यवृत्तीस मुकला तर त्यासाठी महाविद्यालये जबाबदार राहणार असून अशा महाविद्यालयांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडुन संयुक्तपणे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. सदर महाडीबीटी संकेतस्थळावर सन २०२३-२४ सत्राकरीता शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी ३० जून २०२४ अशी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सन २०२३-२४ मध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग या संर्वगाचे २१ जून अखेर ८५,१९५ अर्जाची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यापैकी इतर मागास बहुजन कल्याण, नागपूर कार्यालयाने ७१,१९८ इतके अर्ज मंजुर केलेले आहेत. तर ७,२८७ इतके अर्ज महाविद्यालयाकडेच प्रलंबित असल्याने त्यावर इतर मागास बहुजन कल्याण,नागपूर कार्यालयास कार्यवाही करता आली नाही. समाज कल्याण विभागाने व इतर मागास बहुजन कल्याण विभागाने वारंवार सुचित करुनही महाविद्यालयांनी याकडे कानाडोळा केल्या असल्याने इतर मागास बहुजन कल्याण विभाग आता अशा महाविद्यालयांवर कार्यवाही करणार आहे. ज्या महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर न केल्यास त्यांच्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक राजेंद्र बुजाडे यांनी केले आहे.

Web Title: The college is responsible if the student misses the scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.