कुटुंब शस्त्रक्रिया सोडून गेलेल्या डॉक्टरच्या चौकशीचा अहवाल आज सादर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:00 AM2023-11-16T11:00:21+5:302023-11-16T11:06:43+5:30
ही घटना मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी घडली.
नागपूर :जिल्हा परिषदेच्या खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चहा न मिळाल्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजराम भलावी गेले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त तीन सदस्यीय समितीने चौकशी केली आहे. याबाबचा अहवाल गुरुवारी (दि. १६) प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे.
जि.प.च्या आरोग्य सभापती व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते. याबाबतच्या अहवाल तीन दिवसात सादर करण्यास सांगितले. परंतु दिवाळीच्या सुट्यामुळे अहवाल सादर करण्यात आला नाही. तो गुरुवारी सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ३ नोव्हेंबरला भलावी हे प्राथमिक आरोग्य केंद्र खात येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरांत शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले व तेथे त्यांनी ९ पैकी ५ शस्त्रक्रिया करून ४ शस्त्रक्रिया न करता अर्ध्यावर टाकून निघून गेले होते. यामुळे शस्त्रक्रियेसाठी भूल दिलेल्या भारती नितेश कानतोडे (रा. पाहुणी), प्रतिमा प्रमोद बारई (रा. ढोलमारा), करिश्मा श्रीधर राजू (रा. खात) आणि सुनीता योगेश झांजोडे या चार महिलांना ताटकळत बसावे लागले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केली होती.
दरम्यान कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये कसूर केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. बी. राठोड यांनी भलावी यांना नोटीस बजावून उलट टपाली खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. भलावी यांनी शस्त्रक्रिया शिबिरामध्ये उपस्थित राहून शस्त्रक्रिया करण्याकरिता वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते; मात्र वैद्यकीय अधीक्षक, पारशिवनी अथवा जिल्हा शल्यचिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय नागपूर किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर यांच्यापैकी कुणाची परवानगी त्यांनी घेतली नव्हती. वरिष्ठांनी याबाबत भलावी यांना स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते.