ग्रीन जीम साहित्याची किंमत अडीच लाख; खरेदी साडे सहा लाखांची !
By गणेश हुड | Published: November 25, 2023 05:33 PM2023-11-25T17:33:08+5:302023-11-25T17:41:26+5:30
जि.प. अध्यक्षांचे देयके थांबविण्याचे आदेश : संयुक्त चौकशी करणार
नागपूर : खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील ग्रीम जीमसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले. परंतु, गरज नसताना हे ग्रीम जीम लावण्यात आले. समाजकल्याण विभागाने जे ग्रीन जीमचे साहित्य अडीच लाखांत खरेदी केले. तेच साहित्य बांधकाम विभागामार्फत ६.५० लाखांत खरेदी केले. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी केला.
जिल्ह्यातील रस्ते खराब झाले असून, रस्ते दुरुस्तीसाठी शासन निधी उपलब्ध करून देत नाही. मात्र, ग्रीन जीमवर कोट्यवधीची उधळपट्टी केली जात आहे. मागील जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांनी हा विषय उपस्थित केला होता. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले होते. परंतु, त्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. शुक्रवारी सभागृहात हा विषय पुन्हा चर्चेला आला. सदस्यांनी ग्रीम जीमवरून सभागृहात चांगलाच संताप व्यक्त केला.
समाजकल्याण विभागाने ग्रीन जीमचे साहित्य अडीच लाखांत खरेदी केले. तेच साहित्य बांधकाम विभागाने ६.५० लाखांत कसे खरेदी केले? इतकी तफावत कशी? अस सवाल केला. त्यावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. १३ लाखांत १८५ ग्रीन जीम जिल्ह्यात बसविण्यात आले आहे. उमरेड तालुक्यात ग्रीन जीम लावायची होते, तिथे लावले नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
चौकशीनंतरच देयके द्या
जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, दुधराम सव्वालाखे, दिनेश ढोले यांच्यासह इतरही सदस्यांनी ग्रीन जीमचा मुद्दा उपस्थित केला. यावर अध्यक्षांनी सदस्यांना घेऊन बांधकाम अधिकार्यांनी ग्रीन जीमची चौकशी करण्याचे निर्देश दिले. चौकशी होईपर्यंत कंत्राटदारांची देयके देवू नका, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी सभागृहात दिले.