'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे', राष्ट्रसंतांच्या या भजनाची देशाला गरज; नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 09:30 PM2022-05-25T21:30:51+5:302022-05-25T21:32:01+5:30
Nagpur News राष्ट्रसंतांनी रचलेल्या भजनाची आज देशाला गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
नागपूर : ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे... हे सर्व पंथ-संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे ..’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या भजनाची, जे पुढे विद्यापीठ गीत म्हणून निश्चित करण्यात आले, भुरळ स्वत: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना पडली. या विद्यापीठ गीताच्या दोन ओळी स्वत: म्हणून दाखवित त्यांनी या गीताची आज खऱ्या अर्थाने राज्यासह देशाला गरज असून, या गीताचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०९व्या दीक्षान्त समारंभ बुधवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ.संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे व व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते.
उदय सामंत यांना राष्ट्रसंतांच्या गीतांची भुरळ पडली
उदय सामंत म्हणाले, सध्याची जी शिक्षणपद्धती आहे, त्यापेक्षा चांगली शिक्षणपद्धती विकसित करावी लागली आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त ठरेल, यावर प्रयत्न सुरू आहे, मात्र, विद्यार्थ्यांनीही आपली जबाबदारी झटकू नये. यावेळी सर्व विद्यापीठांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी विद्यापीठांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संचालन डॉ. मोईज हक आणि डॉ. कोमल ठाकरे यांनी केले.
- नालंदा विद्यापीठासारखी प्रगती करा
आपल्या देशात नालंदासारखी विद्यापीठे होऊन गेली. जिथे जगभरातून विद्यार्थी शिकण्यासठी यायचे. त्या नालंदा विद्यापीठासारखी प्रगती विद्यापीठाने करावी, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे केले.
लालवानी यांना डी.लिट., अपराजिता गुप्ता हिला ८, तर आरजू बेग हिला ७ सुवर्णपदके
यावेळी मानवविज्ञान शाखेत डॉ. दयाराम लालवानी यांना डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले. तसेच अपराजिता गुप्ता हिने बी.ए., एलएल.बी. परीक्षेत सर्वाधिक आठ सुवर्णपदके व दोन पारितोषिक प्राप्त केले. आरजू बेग या विद्यार्थिनीने एमबीए परीक्षेत सात सुवर्णपदके पटकाविली, तर निधी साहू हिने एम.एसस्सी (केमिस्ट्री) परीक्षेत चार सुवर्णपदक व एक रौप्यपदक, शुभांगी धारगावे हिने एम.ए. (मराठी) मध्ये ४ सुवर्ण १ पारितोषिक, श्रिया नंदागवळी हिने चार सुवर्ण एक पारितोषिक आणि रूपाली हिवसे हिने एम.एड. परीक्षेत चार सुवर्णपदके व एक पारितोषिक प्राप्त केले. यासोबतच विविध परीक्षांमधील ११० प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १५१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, ९ रौप्यपदके आणि २९ पारितोषिके अशी एकूण १८९ पदके व पारितोषिके प्रदान करण्यात आली.