आधुनिक युगात पाळल्या म्हशी, लाखोंचे उत्पादन आता दरवर्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 03:04 PM2023-01-16T15:04:10+5:302023-01-16T15:07:17+5:30

'त्या' जोडप्याने दुग्ध व्यवसायातून केली उन्नती, इतरांसाठी प्रेरणादायी

The couple prospered from dairy business; earning lakhs in a year | आधुनिक युगात पाळल्या म्हशी, लाखोंचे उत्पादन आता दरवर्षी

आधुनिक युगात पाळल्या म्हशी, लाखोंचे उत्पादन आता दरवर्षी

Next

दत्तात्रय दलाल

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : दोघांचेही शिक्षण दहावीपर्यंत. घरची परिस्थिती जेमतेम. कोणत्याही नोकरीची संधी नाही. अशा परिस्थितीत न घाबरता परिस्थितीशी दोन हात करण्याचा संकल्प एका जोडप्याने केला. चार वर्षांआधी सुरुवातीला एक म्हैस पाळून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. आज तब्बल १४ म्हशी त्यांच्याकडे असून, त्यातून महिन्याकाठी एक - दीड लाखांचे उत्पन्न ते घेतात.

शहरालगतच्या खेड येथील एकता नगरमध्ये वास्तव्यास असलेले (मूळ गाव खंडाळा) रत्नाकर पुंडलिक शेंडे व त्यांची पत्नी रोहिणी रत्नाकर शेंडे एक मुलगा व मुलीसोबत छोट्याशा घरात राहतात. त्यांच्याकडे एक - दोन नव्हे तर तब्बल १४ म्हशी आहेत. घरी जागा नसल्याने बाजूच्या मोकळ्या जागेत ते म्हशी ठेवतात. वर्षभरात मागे-पुढे म्हशी पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे वर्षभर त्यांचा दुग्ध व्यवसाय अविरत चालतो. दररोज १०० - १२५ लिटर दूध प्रति लिटर ४० - ५० रुपये दराने ते विकतात. शिल्लक राहिलेल्या दुधाचे पनीर तयार करून ३६० रुपये किलो तर तूप ६०० रुपये लिटरप्रमाणे विकतात. यातून महिन्याकाठी एक - दीड लाखांचे उत्पन्न ते घेतात. शिवाय शेणखत विकून त्यातूनही मोठे उत्पन्न त्यांना मिळते.

ती आहे सर्वांची आई

शेंडे यांच्याकडे फक्त म्हशीच नाहीत तर जर्मन शेफर्ड जातीचे श्वान, त्यांची पिल्लं, बेरड जातीच्या कोंबड्या, त्यांची पिल्लं, पोपट असे मोठे २४ प्राणी आहेत. तर मोठ्या संख्येत त्यांची पिल्ले आहेत. त्या सर्वांचा सांभाळ रोहिणी करतात. आपल्या मुलांसह प्राण्यांनादेखील आई बनून प्रेमाने व मायेने त्यांची जपणूक करतात.

बेरोजगार युवकांसाठी दुग्ध व्यवसाय प्रेरणादायी

अनेक तरुण हाताला काम नाही म्हणून बेरोजगार आहेत. याच नैराश्यातून अनेकजण हताश झाले आहेत. अनेकांची त्यामुळे लग्न जुळणे कठीण आहे. शेंडे यांनी सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायाची प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे व आत्मनिर्भर व्हावे.

Web Title: The couple prospered from dairy business; earning lakhs in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.