क्रिकेट मॅच संपली अन् वर्धा रोडवर अडकली हजारो वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2023 09:28 PM2023-02-11T21:28:00+5:302023-02-11T21:28:24+5:30
Nagpur News जामठ्याच्या व्हीसीएस स्टेडियममध्ये दुपारी २.१७ वाजता ऑस्ट्रेलियाची अखेरची विकेट पडली आणि भारताने टेस्ट मॅच जिंकली. मॅच लवकर संपल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली व वर्धा मार्गावर जाम लागला.
नागपूर : जामठ्याच्या व्हीसीएस स्टेडियममध्ये दुपारी २.१७ वाजता ऑस्ट्रेलियाची अखेरची विकेट पडली आणि भारताने टेस्ट मॅच जिंकली. मॅच लवकर संपल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली व वर्धा मार्गावर जाम लागला. वाहतूककोंडीतून वाचण्यासाठी अनेक वाहन चालकांना हिंगणा मार्गाने नागपूरला येण्याची पाळी आली.
भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या दरम्यान जामठ्याचे व्हीसीए स्टेडियम अर्धेच भरलेले होते. व्हीसीएने दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये केवळ २३,९४२ प्रेक्षक होते, परंतु मॅच संपताच वर्धा मार्गावर गर्दी झाली. यूटर्न घेण्याच्या नादात अनेक वाहने अडकून पडली, तर अनेक युवक आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभे करून गप्पा मारू लागले. पाहता-पाहता वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांनी वाहतुकीची कोंडी आणखीनच वाढविली, तर वारंगा लॉ युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित दीक्षांत समारंभामुळे व्हीआयपी मूव्हमेंट वाढल्यामुळे या वाहतूककोंडीत आणखी भर पडली. दरम्यान, दुपारी तीन वाजता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गर्दी होणे सुरू झाले. त्यात वर्धा मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला नसल्याने वाहतुकीची समस्या आणखीनच वाढली होती. वाहतुकीची कोंडी होत असताना, वाहतूक पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
..............