‘सायबर क्राईम’चा ‘व्हायरस’ इलॉन मस्कच्या संपत्तीहून अधिक नुकसान करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 07:00 AM2022-05-19T07:00:00+5:302022-05-19T07:00:01+5:30
Nagpur News २०३१ पर्यंत ‘सायबर क्राईम’मुळे जगभरातील आर्थिक नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता असून, केवळ ‘रॅन्समवेअर’मुळे दहा पटींहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
योगेश पांडे
नागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात ‘सायबर क्राईम’चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात असून, पुढील पाच वर्षांत याचे स्वरूप आणखी वाढण्याचा धोका आहे. २०३१ पर्यंत ‘सायबर क्राईम’मुळे जगभरातील आर्थिक नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता असून, केवळ ‘रॅन्समवेअर’मुळे दहा पटींहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पुढील नऊ वर्षांत नुकसानाची आकडेवारी २६५ बिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीहून हा आकडा ४५ बिलियन डॉलर्सहून अधिक असून, यातूनच होणाऱ्या नुकसानाची गंभीरता लक्षात येते. अमेरिकेतील ‘सायबर सिक्युर व्हेंचर्स’ या संस्थेतर्फे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागील काही काळापासून ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ गंडा घालण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यादृष्टीने केलेल्या संशोधनातून संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. २०१७ मध्ये ‘रॅन्समवेअर’मुळे जगाला ‘पाच बिलीयन डॉलर्सचे नुकसान झाले होते. २०२१ मध्ये यात चारपट वाढ झाली, तो सुमारे २० बिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचला. २०३१ मध्ये हा आर्थिक नुकसानाचा २६५ बिलीयन डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
२०२१ मध्ये प्रत्येक ११ सेकंदाला विविध ग्राहक, कंपन्यांवर ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून जाळे फेकण्यात आले. २०३१ पर्यंत दर दोन सेकंदाला ग्राहक किंवा व्यावसायिक आस्थापनांवर नवीन हल्ला होईल, असा अंदाज आहे.
सावध व्हा, क्रिप्टोक्राईम्सदेखील वाढणार
क्रिप्टोकरन्सीशी संबंधित असलेले क्रिप्टोक्राईम्सदेखील वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २०२१ मध्ये जगभरात क्रिप्टोक्राईम्समुळे १७.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. तो आकडा २०२५ मध्ये ३० अब्जांवर पोहोचण्याची शक्यता आहे. विविध क्रिप्टो ॲप्स तसेच क्रिप्टो लेंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढण्याचा अंदाज आहे.
१० टक्केच गुन्ह्यांची नोंद
संस्थेच्या संशोधनानुसार १० टक्केच सायबर गुन्ह्यांची पोलीस किंवा इतर यंत्रणांकडे तक्रार केली जाते. कागदोपत्री सायबर गुन्ह्यांची संख्या खूपच कमी दिसते व याचे कारण त्यांची नोंद होत नाही. संभ्रम, प्रतिष्ठेला हानी पोहोचण्याची भीती आदी कारणांमुळे या तक्रारींचे प्रमाण कमी आहे.
‘सायबर क्राईम’शी निगडित महत्त्वाचे अंदाज
- पुढील पाच वर्षांत जगभरात एकूण ‘सायबर क्राईम’ वाढेल व दर वर्षाला आर्थिक नुकसानाचा आकडा १५ टक्क्यांनी वाढत जाईल.
- डिजिटल ॲडच्या माध्यमातून लोकांना गंडविण्यावर भर असेल.
- विविध कंपन्यांमध्ये ‘सायबर’ सुरक्षेवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार
- सायबर विमा क्षेत्राचा विस्तार होणार. २०२१ च्या तुलनेत २०३१ पर्यंत सायबर विमा क्षेत्रातील आर्थिक उलाढाल चार पटींनी वाढणार
‘रॅन्समवेअर’ म्हणजे काय ?
‘रॅन्समवेअर’मध्ये सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुम्हाला खंडणीची मागणी करतो. संगणक हॅकिंग कुठल्याही माध्यमातून होऊ शकते. जर ठराविक मुदतीत रक्कम दिली नाही तर संगणक यंत्रणेतील सर्व डेटा ‘डिलिट’ करण्यात येईल, अशी धमकीच दिली जाते. अशी कामे करण्यासाठी ‘डार्क वेब’वर उपलब्ध असलेल्या विविध ‘रॅन्समवेअर सॉफ्टवेअर्स’चादेखील उपयोग करण्यात येतो.